इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कल्याणः मुंबईत काँग्रेसच्या प्रचारसभेच्या वेळी फटाके फोडल्याने एकजण भाजल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवारांच्या जीवाशी बेतले. यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.
विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे; मात्र कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पक्षाचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. या वेळी काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या जीवावर बेतले. मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता.
हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. या हारासोबत काही इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाके लावण्यात आले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर पडली. क्षणार्धात मुथा यांच्या केसांनी पेट घेतला. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ धावपल करून आग शमवली. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा कशाप्रकारे धोका निर्माण करू शकतो, याचा हा पुरावा आहे.