कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई, ठाणे आणि परिसरातील उपनगरांमध्ये अनेक उंच उंच इमारती आहेत. साहजिकच यामध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. परंतु काही इमारतींच्या लिफ्ट या नादुरुस्त असल्याने मध्येच बंद पडतात आणि त्यात नागरिकांना अडकून पडावे लागते, काही वेळा तर लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित होतो आणि जनरेटर नसल्याने लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना घडतात. परंतु यामध्ये लहान बालके अडकली तर मोठा अनर्थ घडू शकतो, असाच प्रकार कल्याण शहरात घडला आहे. त्याच सध्या पावसाळा सुरु असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकदा लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना उघडकीस येतात.
मुलीचा आरडाओरडा
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीमध्ये एक १५वर्षाची मुलगी ६ महिन्यांच्या बाळासह लिफ्टमध्ये अडकली. रहिवाशांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना जमले नाही. इमारतीत मोठा कल्लोळ सुरु झाला. अखेर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने हायड्रोलिक कटरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून दोघांची सुटका केली. दोघांची सुटका होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सदर मुलगी बाळाची नात्याने मावशी आहे. दुपारी बाळ खूप रडत होते, म्हणून ही मुलगी बाळाला इमारतीच्या खाली खेळवायला घेऊन चालली होती. तिने बाळासह लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि लिफ्ट सुरु केली. मात्र लिफ्ट खाली येत असतानाच परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने लिफ्ट बंद पडली. लिफ्ट बंद झाल्याने मुलीने आरडाओरडा सुरु केला. कारण आता नेमके काय करावे हे तिला सुचेना.
अग्निशामक दल तात्काळ दाखल
त्याच वेळी हा आरडाओरडा ऐकून इमारतीतील रहिवासी गोळा झाले. तेव्हा आधी स्थानिक रहिवासी आणि वॉचमनकडून मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याने त्वरित अग्निशामक दलाला लिफ्टमध्ये छोटे बाळ अडकल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटातच हायड्रोलिक कटरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडला. मग या दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे येथे जनरेटर बसविण्याची मागणी होत आहे.