ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका तरूण तोतया पोलीसाने एका तरूणीशी मैत्री करत प्रेमाचे नाटक करून तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवत वारंवार बलात्कार करून पीडितेशी लग्नास नकार देऊन धोका दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.
पीडितेकडून पैसे उकळले
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर परिसरातील शहाड भागात एक महिला आपल्या कुटुंबासह राहते. तिची कल्याण जवळच्या म्हारळ येथील राजेश कृष्णाबोध झा ( वय ३३ ) याच्याशी ओळख झाली, ही पिडीत महिला एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यानंतर मैत्री होऊन पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बाहेर फिरण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपी हॉटेलमध्ये नेत होता. पीडितेला त्याने लग्नाचे आश्वसन दिले. तसेच तो शारीरिक संबंधासाठी हट्ट करीत असे, मात्र त्याला पीडिता नकार देत होती. त्यानंतरही वारंवार गोड बोलून पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर प्रेमाच्या नाटकी बहाण्याने पीडितेवर आरोपी वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपीने घर दुरुस्तीसाठी पैसे लागतील असे सांगून त्याने पीडितेकडून ६० हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे पिडीतेने याशिवाय दोन महागडे मोबाईल फोनही पीडितेकडून आरोपीने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या तरुणीशी गुपचूप लग्न
अखेर पीडितेने आरोपीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्यांनी पीडितेला अपमानित करून तू दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आम्ही लग्न करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीला पीडितेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो भेटण्यासाठी टाळाटाळ करून पीडितेच्या मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यानंतरही पीडितेने आरोपीकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला असता, तो पोलीस खात्यात असल्याचे भासवून पीडितेला धमकी देत होता. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने काही महिन्यापूर्वीच दुसऱ्या तरुणीशी गुपचूप लग्न केल्याचे पीडितेला माहिती मिळताच आपली फसवणूक करून आरोपीने धोका दिल्याने समजले. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन महिना उलटून गेली तरी देखील पोलीस आरोपी पकडत नसल्याचा आरोप पीडितेने केला असून आरोपीला तातडीने अटक करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.