कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यामधील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याने सिद्धेश्वर बंधाऱ्याची उंची वाढविण्याबरोबर सुळे उजव्या कालव्यातील त्रुटी व इतर कालव्यावरील कामांसाठी व भूसंपादन जमीन मोबदल्यासाठी शासनाने 150 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे 10 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून तालुक्यातील पाणी प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याची माहीती आमदार नितीन पवार यांनी दिली.
मुंबई येथे मंत्रालयात तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्याचा शेतकऱ्यांना फायदा नसल्याची तक्रार करुन लक्ष वेधल्यामुळे सप्टेंबर 2020 मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए जीं मोरे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले यांनी 21 किमी पर्यंत कालव्यातील पाणी पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची पाहणी केली होती. पाणी पोहोचण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत आमदार नितीन पवार हे आग्रही असल्यामुळे शासनाने यासंदर्भात अहवाल मागितला होता.
शासनाने 150 कोटी रुपयांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून त्यात 42 कोटी रुपये जमीनीचा भूसंपादन मोबदला दिला जाणार आहे. 118 कोटी रुपयांची विविध कामे केली जाणार असून त्यात सिद्धेश्वर बंधाऱ्याची उंची वाढविण्यात येणार असल्यामुळे पाण्याची उंची वाढवून सुळे व सुपले कालव्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहचून सिंचनांचा लाभ होणार आहे.
सुळे उजवा कालवा कि.मी. 1 ते 20 पुर्ण क्षमतेने वाहत नसल्याने व कालव्याचा बहुतांश भागात सर्वसाधारण खोदाईच्या भागात पाईप टाकून कालवा बंदिस्त करण्यात येणार आहे त्यामुळे कालव्यावरील पिंपळे , रवळजी , मोकभणगी , देसराने , पाडगन , इशी , पाटविहारे , नाकोडा आदी गावातील 697 हेक्टर सिंचन क्षेत्रातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे . सुळे उजव्या कालव्याच्या वितरण प्रणाली साठी बंदिस्त पाईपाव्दारे चाऱ्यांची कामे करण्यात येणार असल्यामुळे 273 हेक्टर क्षेत्रात सिंचनाची वाढ होणार आहे .
सुपले उजवा कालवा कि.मी . 1 ते 7 मधील कालवा डोंगराच्या कडेकडेने जात असल्याने पाण्याची गळती होते. कालव्याच्या सर्वसाधारण खोदाईच्या भागात गाळ साचल्यामुळे कालवा पाईपाने बंदिस्त करून व कालवा गळतीच्या ठिकाणी काँक्रिट लायनिंग करून कालव्याव्दारे 283 हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे त्याचा प्रतापनगर , काठरेदिगर , सुपळेदिगर , जयदर या गावांना फायदा होणार आहे .
सुपळे डावा कालवा व सुळे डावा कालव्यांचे आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असून शेरी , भैताणे , सावरपाडा , गणोरे , देसराणे , धणेर , ककाणे , बिजोरे , विसापुर , पिळकोस इत्यादी गावातील तसेच चणकापुर उजवा कालव्यातील आवश्यक दुरुस्ती करुन कळवण तालुक्यातील निवाने ,भेंडी ,मानुर गावातील लाभधारकांना त्याचा सिंचनाचा लाभ होणार आहे .
सुळे उजव्या कालव्याचा प्रश्न शासनस्तरावर दुर्लक्षित होता. शेतकऱ्यांना कालव्याचा फायदा होत नसल्याचे जलसंपदा विभागाच्या बैठकीत लक्षात आणून दिल्यानंतर त्याविषयी बैठकीत चर्चा झाली.सप्टेंबर 2020 मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंताबरोबर कालव्याची पाहणी केल्यानंतर शासनस्तरावर वस्तूनिष्ठ अहवाल सादर झाल्यानंतर शासनाने 150 कोटी रुपयांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
– नितीन पवार, आमदार, कळवण
Kalwan Siddheshwar Bandhara and Sule Kalva work 150 crore fund