अभोणा, ओतूरला भेट देऊन आमदारांनी केली पाहणी
कळवण – कळवण उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका मिळाली असून तिचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणेसमवेत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला आमदार पवार, तहसीलदार बी ए कापसे, डॉ शरद परदेशीं, डॉ प्रल्हाद चव्हाण व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि अडचणी जाणून घेत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अभोणा ग्रामीण रुग्णालय येथे भेटी देऊन पाहणी केली.
ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाचे संक्रमण हे भयानक स्थितीत जाऊन पोहोचले असल्यामुळे कोविड सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्याचे आतापासून नियोजन करा, सर्व आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध करुन रुग्णांना वेळेवर औषधं द्या, कोणीही रुग्ण उपचार आणि औषधं विना परत जाणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी आरोग्य यंत्रणेला केली.
आमदार नितीन पवार यांनी कळवण उप जिल्हा रुग्णालय येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. कोविड सेंटरची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून विचारपूस केली.कोविड सेंटरला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात दाखल रुग्णांना औषधं पुरवठा होतो किवा नाही हे रुग्णांकडून जाणून घेतले आणि आवश्यक सुविधाचा आढावा घेत कळवण तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून कळवण उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी तहसीलदार बी ए कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शरदसिंग परदेशीं, डॉ प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.
आमदार पवार यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली असता १८ पैकी फक्त ४ कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे उर्वरित कर्मचारी शिबीर यशस्वी करण्यासाठी गेले असल्याचे डॉ बहिरम यांना यावेळी सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी आमदार नितीन पवार यांनी जाणून घेत कोरोना संकट काळात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली.यावेळी मंगेश देसाई,दिगंबर पवार,देवा मोरे, ज्ञानेश्वर पवार, तुकाराम गोघडे आदी उपस्थित होते.
अभोणा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सुविधा, औषधं मिळतात का याची विचारणा केली. औषधंसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना करुन रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत का ? हे जाणून घेत रुग्णालयाची पाहणी केली. अभोणा ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छता असल्याने असमाधान व्यक्त केले. स्वच्छता ठेवण्याची सूचना केली.यावेळी डॉ दीपक बहिरम व कर्मचारी उपस्थित होते.