कळवण : कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसात रासायनिक खतांचा किमती वाढल्या असून शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. पिकवलेल्या शेतमालाला भाव योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे मात्र उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्गात संताप आहे.त्यामुळे खतांच्या किंमती कमी करा यासह विविध मागण्याचे निवेदन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
दरम्यान रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असून युरिया प्रमाणे खतावर सबडीडी देण्याची मागणी केंद्राकडे केली असल्याचे नामदार भुसे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव,उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, माजी शहरप्रमुख मोतीराम पगार,ग्राहक कक्ष शहरप्रमुख किशोर पवार व ग्रामीण सोशल मीडिया प्रमुख ललित आहेर आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कळवण शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
कोरोना महामारीत कळवण या आदिवासी बहुल तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असून कळवण,मानूर व अभोणा येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन द्या. कोविड सेंटरमधील व्हेंटीलेटर हे बंद अवस्थेत असून आरोग्य विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय मशिनरी व सामग्री ,औषधसाठा मुबलक स्वरुपात उपलब्ध करुन द्यावा,कोरोना रुग्णाना कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळत नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली असून सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्यात. कळवण उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरु झालेले ५० बेडचे अत्याधुनिक कोविड सेंटर सुरु झाले आहे. ते पूर्ण क्षमतेने सुसज्ज सुव्यवस्थेसह सुरु करावे, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने तात्काळ नियोजन व उपाययोजना करावी, लहान मुलांना उपचारासाठी एक बालरुग्ण कोविड सेंटरची उभारणी करावी ,कोरोना चाचणी केंद्र वाढवावे, कळवण शहरात नगरपंचायतच्या आरोग्य विभागाने तात्काळ सर्व प्रभागात फवारणी करावी,आदिवासी गावात व पाड्यात करोना लसीकरणबाबत जनजागृती करावी,लसीचा आदिवासी तालुक्यात उद्दिष्ट वाढवावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.शेतकरी बांधवांमध्ये खते, बी बियाणे यांच्या भरमसाठ झालेल्या दरवाढीमुळे नाराजी आहे त्यामुळे दरवाढ कमी करण्याची विनंती शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. खते दरवाढीवर लवकरच नियंत्रण आणले जाईल असे आश्वासन नामदार भुसे यांनी दिले.