कळवण –: बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयामुळे कळवण तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन नाराजी व्यक्त केली.यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून संपूर्ण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले आहे मग महाराष्ट्रासाठी कायदे वेगळे आहेत का ? बोटावर मोजण्याइतक्या काहींची परिस्थिती वगळता इतर संपूर्ण मराठा समाजाची आर्थिक स्थिती चांगली नाही. जर इतर समाजातील लोकं मागास असू शकतात तर मराठा समाज मागास असू शकत नाही का ? असा प्रश्न शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, मनसेचे माजी शहरप्रमुख नितीन पगार यांनी उपस्थित केला आहे.
ज्या महाराष्ट्राचे मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केले अशा समाजाला आरक्षण मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पगार, टीनू पगार यांनी व्यक्त केले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की,सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला, या निर्णयामुळे मराठा युवकांचे, येणाऱ्या पिढीचे फार मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे, मराठा समाजाच्या भावना, अपेक्षा, भविष्य अंधाराकडे नेण्याचं काम या निर्णयामुळे झाले आहे, ह्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, सरकारने यातून सकारात्मक मार्ग काढावा, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण मिळे पर्यंत लढा सुरूच राहील हे शासनाने लक्षात घ्यावे असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर प्रदिप पगार, प्रमोद रौदल, टिनू पगार, मनोज देवरे,मोती पगार, नितीन पगार, रविंद्र पगार, राकेश हिरे, ललीत आहेर,भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.