कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वेरूळे गावात वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. या घटनेत नातू शहाजी काळू कोल्हे यानेच आपल्या आजी आजोबाची हत्या केल्याचे समोर आले आहे. खर्चासाठी पैसै देत नसल्यामुळे ही हत्या केल्याची कबूली त्याने दिली.
शनिवारी ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला आहे. नारायण कोल्हे व सखुबाई कोल्हे असे हत्या झालेल्या वृध्द दाम्पत्यांचे नाव असून ते मळ्यात एकटेच राहत होते. राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाशेजारी कुऱ्हाडही मिळून आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपास सुरु केला व त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. रात्री उशीरापर्यंत नातू शहाजी काळू कोल्हे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने हत्या केल्याची कबूली दिल्याची माहिती अभोणा पोलिसांनी दिली. त्याने या हत्येमागील दिलेले कारणही धक्कादायक आहे. वृध्द दांम्पत्याकडून वेळोवेळी खर्चासाठी पैसे दिले जात नाही. तसेच भेदभाव करतात याचा राग आल्यामुळे कु-हाडीचा घाव घातला असे त्याने सांगितले.