कळवण – कळवण तालुक्यासह पुनंद खो-यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होत असुन मका, सोयाबीन, मिरची, टोमेटो, भूईमुग, बाजरी पीके अनेक ठिकाणी पाण्याखाली गेली आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असून ग्रामीण आदिवासी भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गिरणा व पुनंद नद्यांना पूर आल्याचे चित्र असून दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नदी काठावरील जमीनी मधील पीके भूईसपाट झाली आहे. अनेक शेतक-यांच्या पीकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी महाग बी बियाणे. खते खरेदी करून पेरनी केलेली पीके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाने झालेल्या नुकसानीची शासनस्तरावरील अधिकारी कर्मचारी यानी पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी कळवण तालुक्यासह पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.