– कळवणला महिन्याभरात ऑक्सिजन जनरेशन प्लांटही कार्यन्वित होणार आ. पवार यांची माहिती
कळवण – कळवण उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर मंजूर करण्यात आले असून त्यात १५ व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. ५० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये वायरलेस आरोग्य तपासणी यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा प्रथमच कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयातील ५० बेडच्या कोविड सेंटरचे काम युद्ध पातळीवर सुरु असून तात्काळ कामे पूर्ण करुन दोन दिवसात सेंटर कार्यन्वित करुन रुग्णांना दिलासा देण्याची सूचना आमदार पवार यांनी दिली तर सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना करुन दोन दिवसात काम पूर्ण करा नाहीतर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी तहसीलदार बी ए कापसे आदी उपस्थित होते.
आमदार पवार यांनी यावेळी सांगितले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला असून त्याची निविदा काढण्यात आली आहे. महिनाभरात ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित होणार आहे.
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यन्वित झाल्यानंतर सुरगाणा,अभोणा,बाऱ्हे येथील प्लांट कार्यन्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट भविष्यात गरजू रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून भविष्यात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
यावेळी गोपाळखडी येथील कोविड केअर सेंटरला आमदार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मीना, तहसीलदार कापसे यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड सेंटरमध्ये सध्या निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा प्रश्न सोडविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः लक्ष घालून प्रश्न सोडविणार असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शरद परदेशीं, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, डॉ प्रल्हाद चव्हाण, डॉ दीपक बहिरम, डॉ परागपगार, डॉ विलास चव्हाण, डॉ बंगाळ आदी उपस्थित होते.