कळवण – श्री क्षेत्र सप्तश्रुंग गडावर येणारे देवी भक्त आणि देवस्थान आणि ग्रामस्थांचा उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी सप्तश्रुंग गड नवीन पाणी पुरवठा योजनेला महाविकास आघाडी सरकारने ९ कोटी २३ लाख रुपयांची खास बाब म्हणून प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी दिली. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात सप्तश्रुंगी गडावरील नवीन पाणी पुरवठा योजनासह सप्तश्रुंगी गडावरील विविध विकास कामासंदर्भात आमदार नितीन पवार यांच्यासह सप्तश्रुंगी गडावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सप्तश्रुंगी गड नवीन पाणी पुरवठा योजनेच्या ९ कोटी २३ लाख रुपये किंमतीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या यंत्रणेला पाणी पुरवठा योजनेची शासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन योजनेचे काम लवकर सुरु करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. आमदार नितीन पवार यांनी सप्तश्रुंगी गडावरील योजनेला खास बाब म्हणून मान्यता दिल्याबद्दल पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे यावेळी बैठकीत विशेष आभार मानले.
सप्तशृंगी गडावर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. मात्र पाणी साठवण्यासाठी भवानी पाझर तलावाशिवाय दुसरे साधन नाही. भाविक, ट्रॉली व्यवस्थापन व देवस्थानला लागणारे पाणी नडगी नाला परिसरात नवीन धरण बांधल्यास गडावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल हा पर्याय पुढे आल्यामुळे या परिसरात तलाव बांधण्यासाठी वनविभागाने जागा दिली आहे. नवीन तीन टीमसी क्षमतेचा तलाव बांधून पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण झाले असून शासनस्तरावर प्रास्तवित प्रस्तावाला ९ कोटी २३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजय दुबे शहराध्यक्ष शांताराम सदगिर नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत, माजी सरपंच राजेश गवळी दत्तू बर्डे दिपक जोरवर दिलीप बर्डे गणेश अहिरे आदी उपस्थित होते.
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार
सप्तश्रुंगी गडावर चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव या दोन मोठ्या यात्रा बरोबर वर्षेभरात देशाच्या कान्याकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात देवीभक्त सप्तश्रुंगी गडावर येतात. यात्रा काळात पिण्याचा पाण्याची टंचाई निर्माण होते. सध्या असलेली पाणी योजना अपूर्ण पडत असल्यामुळे भाविक व देवस्थानचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे.
– आमदार नितीन पवार, कळवण