कळवण – कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात २ कोटी ८९ लक्ष रुपये खर्चून सीटी स्कॅन यंत्रणा लवकरच कार्यन्वित होणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ८९ लक्ष रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. खरेदी संदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून येत्या काही दिवसात सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहीती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी दिली .
१०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात कळवण ,सुरगाणा , बागलाण, देवळा ,चांदवड तालुक्यातील व आदिवासी ,दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदीवासी व गोरगरीब बाह्य रुग्ण व आंतर रुग्ण उपचारासाठी तसेच अत्यवस्थ रुग्ण संदर्भसेवेसाठी दाखल होतात.सीटी स्कॅन मशीन नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची मोठी गैरसोय होत होते. सीटी स्कॅनसाठी रुग्णांना नाशिक, मालेगावला येथे जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे.दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत सीटी स्कॅन मशीनरीची गरज असल्याचे आमदार नितीन पवार यांच्या निदर्शनास आले.या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीत वैद्यकीय यंत्रणेने व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागणी केल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी सीटी स्कॅन मशीनरीची मागणी करुन प्रस्ताव सादर केला होता. बैठकीत त्याला मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाला सीटी स्कॅन मिळणार असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांचे नाशिक व अन्य ठिकाणी जाणे टळणार असून पैसा व वेळेची बचत होणार आहे. अत्याधुनिक सामुग्री व आरोग्य विषयक सुविधा मिळणार असून आदिवासी उपयोजनेत कळवणचा समावेश असल्यामुळे त्याचा फायदा झाला असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.
यंत्रणा लवकरच कार्यन्वित
उपजिल्हा रुग्णालयात कळवण, सुरगाणा ,बागलाण ,चांदवड ,देवळा तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असून वैद्यकीय क्षेत्राला लाभलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ उपजिल्हा रुग्णालयाला लाभल्याने त्याचा रुग्णांना फायदा होतो आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सीटी स्कॅनसाठी प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर झाला आहे. यंत्रणा लवकरच कार्यन्वित होईल.
– आमदार नितीन पवार, कळवण