कळवण – कोरोनानंतरचा ओमायक्रोनच्या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने सजग राहणे गरजेचे असून जनजागृतीवर अधिक भर देत नागरिकांनी मास्कचा वापर कायम करावा, मास्क वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह कळवण तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात तसेच खासगी आस्थापनात नो मास्क नो एन्ट्री बंधनकारक करा, कोविड काळात शासकीय यंत्रणेने मुख्यालयी रहावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
कळवण पंचायत समिती सभागृहात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार पवार बोलत होते. बैठकीस व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,उपसभापती विजय शिरसाठ, तहसीलदार बी ए कापसे, संतोष देशमुख, हेमंत पाटील, ज्ञानदेव पवार, लालाजी जाधव आदी मान्यवर होते. तालुका आढावा बैठकीत विविध खात्याचे विभागप्रमुख उपस्थित नसल्याने प्रारंभी आमदार नितीन पवार यांनी नाराजी व्यक्त करीत तहसीलदार बी ए कापसे यांना कारणे दाखवा देण्याची सूचना केली. पुढील बैठकीस गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत तालुक्यात लसीकरण पूर्ण करण्यावर आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेचा अधिक भर द्यावा, लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता दिसून येत असल्यामुळे तातडीने उपाययोजना करुन १०० टक्के लसीकरण करा असे निर्देश आमदार नितीन पवार यांनी शासकीय यंत्रणेला दिले. १५ ते १८ वयोगटातील लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत करुन कळवण उपजिल्हा रुग्णालय १०० बेडचे कोविड सेंटर करु नये. नॉन कोविड रुग्णांनी कुठे उपचार घ्यायचा असा सवाल आमदार पवार यांनी बैठकीत उपस्थित केला.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांनी जयदर व नांदुरी येथील वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नाराजी नोंदवली. तालुक्यातील उपकेंद्राना कुलूप आढळून येते.वैद्यकीय अधिकारी यांच्या ड्युट्या मॅनेज होत असल्यामुळे कोणी वैद्यकीय अधिकारी सापडत नसल्याने महिलांच्या प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात होत नसल्याने त्या महिलांना नाशिक व कळवणला पाठवले जात असल्याची तक्रार बैठकीत केली. आरोग्य यंत्रणेची माहिती देतांना तालुका वैद्यकीय अधिकारी गोंधळून गेले तर कळवण उपजिल्हा रुग्णालयात कोविड साठी ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पॅनल तयार केले असून उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला ५० बेडचे विलगीकरण कक्ष सुरु करणे गरजेचे आहे. १५ जानेवारी नंतर कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांनी बैठकीत व्यक्त करुन कामकाजाची माहिती दिली.कोरोनाच्या तिसऱ्या लाटे दरम्यान रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे होम आयसोलेशनवर भर देण्याची गरज असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने आयसोलेशन सेंटर सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले. कळवण तालुक्यात वीज तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्याची गरज असून नवीबेज परिसरात १९७३ पासून वीज तारा बदलल्या नाही जीर्ण झाल्या आहेत त्या बदलून देण्याची मागणी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी बैठकीत केली.मळगाव गायदर पाडा रस्ता विकासकामात वन विभागाने अडथळा न आणता सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी महसूल,पंचायत समिती, शिक्षण, आरोग्य,महावितरण,कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जिल्हा परिषद इवद, बांधकाम, लघुपाटबंधारे आदी विविध विभागाचा खातेनिहाय आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील विविध खात्याचे विभागप्रमुख उपस्थित होते.
४५० पांदण रस्त्यांचे प्रस्ताव सादर –
कळवण तालुक्यातील विविध पांदण रस्त्यांचे ४५० प्रस्ताव शासनस्तरावर सादर केले असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवार, पांदण रस्त्यांना प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न आहे.तालुक्यातील स्मशानभूमीला जोडणारे रस्त्यासाठी ग्रामपंचायतने प्राधान्य देण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी बैठकीत केली.