कळवण – एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी आगारात चालकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील कळवण आगारातील बसचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कळवण आगारात सोमवारी (दि.०१)रात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान सध्या या बसचालकावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रमोद शिवाजी सूर्यवंशी रा.वाजगाव ता.देवळा (वय३८) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बसचालकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,कळवण आगारात गेल्या काही वर्षांपासून चालक या पदावर प्रमोद सूर्यवंशी कार्यरत आहेत.ते काही दिवसांपासून सुट्टीवर असल्याने त्यांनी पगारी अर्ज दिला होता मात्र अर्ज वेळेत मंजूर न झाल्यामुळे दोन हजार असा तुटपुंजा पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळीचा बोनस असे अवघे साडे चार हजार रुपये मिळाल्याने घरात आई व पत्नी आजारी असून त्यांच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा तसेच दिवाळीसाठी मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत
म्हणून हतबल होऊन विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रकार काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने प्राण वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत अधिक तपास कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे व पोलिस कर्मचारी करत आहेत.