कळवण – महिलांना हक्क दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही. हक्क आणि त्यांची योग्य अंमलबजावणी जितकी गरजेची आहे, तितकेच त्यांना सक्षम करणेही महत्त्वाचे आहे.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुरक्षेततेसाठी हक्क आणि अधिकार याची समाजात व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कळवण न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता जोशी यांनी केले.यावेळी त्यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कळवण शिक्षण संस्था संचालित आर. के. एम. विद्यालय, कळवण येथे कायदे विषयक शिबिर कळवण न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पवार यांनी केले. या कायदे विषयक शिबिरात वक्ते म्हणून लाभलेल्या विधिज्ञ निकिता पवार यांनी बालकांचा अधिकार तर विधिज्ञ हेमांगी आहेर यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयी मार्गदर्शन केलं.
यावेळी आर के एम विद्यालाचे प्राचार्य एल. डी. पगार, विधिज्ञ नानासाहेब पगार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.सूत्रसंचालन विधिज्ञ संजय बोरसे यांनी केले. आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. एम. महाडिक यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य एल. डी. पगार, पर्यवेक्षक पी. एम. महाडिक, आर. व्ही. सोनवणे, श्रीमती एस. एस. बोरसे व एम. पी. कोष्टी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.