कळवण – लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कळवण शहर व तालुक्यात १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कळवण तालुका महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा देऊन सोशल मीडियाद्वारे व्यापारी बांधवाना बंदचे आवाहन केल्याने आवश्यक सेवा वगळता सकाळपासून सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कळवण, अभोणा, कनाशी येथील आवारात कांदा व भुसार मालाचे लिलावाचे कामकाज बंद ठेवण्यात येऊन महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा देण्यात आला व कृषी कायद्यांचा विरोधात आंदोलकांवर मोटारी घालून ६ शेतकरी बांधवांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक मंडळाने निषेध नोंदवत दोषीवर कारवाईची मागणी सभापती धनंजय पवार यांनी केली. कळवण शहरातील व्यापारी महासंघाने बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे शहरातील सर्व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्यामुळे शहरात व तालुक्यात अभोणा, कनाशी येथे सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे शहरात शुकशुकाट होता. लखीमपुर याठिकाणी शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या तालुक्यातील नेत्यांनी कळवण शहरात सकाळी फेरफटका मारुन व्यापारी व व्यावसायिकांची भेट घेऊन बंदचे आवाहन केले.दरम्यान शहरातील फुलाबाई चौक व एस टी बस स्थानक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा व मोदी सरकारवर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी टिकास्र सोडून निषेध नोंदविला.यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, जितेंद्र पगार, मोतीराम पगार, साहेबराव पगार,सागर जगताप,संभाजी पवार, भाई दादाजी पाटील,विनोद मालपुरे, अजय पगार,किशोर पवार, मुन्ना हिरे,रामा पाटील, विनोद भालेराव, सुनील पगार,मोयोद्दीन शेख,विजय पगारे , अप्पा बुटे अशोक जाधव ललीत आहेर आदी उपस्थित होते.