कळवण –कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला असताना ‘डेल्टा ‘ विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. कोविड व्यतिरिक्त चिकन गुनिया,मलेरिया, डेंग्यू या आजारांबाबतही कळवण व सुरगाणा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी केली.
प्रकल्प अधिकारी कार्यालय कळवण येथे आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीत कोरोना सध्यास्थिती, लसीकरण संभाव्य तिस-या लाटेबाबत उपाययोजना तसेच कळवण सुरगाणा तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
कोविड सेंटरमधील रुग्ण खाटा, औषध – इंजेक्शनचा साठा, ऑक्सिजन प्लांट यंत्रणा आणि पुरवठा याची खातरजमा करण्याची सूचना यावेळी आमदार पवार यांनी प्रशासन व आरोग्य यंत्रणेला केली.मागील काही दिवसांमध्ये कोविड बाधित रुग्णांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. यामध्ये कोविड विषाणूच्या डेल्टा प्रकारचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेऊन आमदार नितीन पवार यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयात कळवण व सुरगाणा तालुक्यातील आरोग्यसह सर्व यंत्रणेची बैठक घेऊन आढावा घेतला. कळवण व सुरगाणा तालुक्यातील कोविडच्या सध्यास्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची सूचना केली. रस्ते, पाणी, वीज, पशुसंवर्धन, महावितरण, सिंचन, ग्रामविकास, वनविभाग, शासकीय योजना, नुकसान भरपाई, पीक पाहणी यांचा आढावा घेऊन नागरिकांची पिळवणूक न करता सहकार्य करण्याची सूचना आमदार पवार यांनी यंत्रणेला केली.
बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना ,उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, कळवणचे तहसिलदार बी.ए.कापसे, सुरगाणा तहसिलदार विजय सुर्यवंशी, कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन पटेल, कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे , सुरगाणा पोलिस निरीक्षक कोळी , अभोणा पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे , कळवणचे गटविकासधिकारी दादाजी जाधव तसेच आरोग्य, सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद,पाणीपुरवठा,वनविभाग , पंचायत समिती, महावितरण, तसेच सर्व शासकीय विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.