आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या प्रयत्नांना यश
कळवण – पुढील २५-३० वर्षाची कळवण शहराची लोकसंख्या गृहीत धरून शहरासाठी जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांना यश आले असून नवीन पाणी पुरवठा प्रकल्प योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत २५ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे हीं योजना लवकरच कार्यान्वीत होऊन शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवण नगर पंचायतच्या पाणी पुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्याकडे सुपूर्त केले. कळवण शहरातील १७ प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडणारी हीं योजना चणकापूर प्रकल्पस्थळावरून नियोजित असून १९ किमी लांबीची गुरुत्वाकर्षणावर चालणारी आहे. आमदार नितीन पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून , तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवल्याने लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून कळवण शहराची तहान भागणार आहे.
कळवण शहरात पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणार असल्यामुळे वीजेची पूर्ण बचत होणार आहे,दरमहा असलेला लाईट बिलाचा भार कमी होणार असल्यामुळे सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणारी ही पथदर्शी अशी जिल्ह्यातील पहिली पाणीपुरवठा योजना ठरणार आहे.यामुळे कळवण शहरातील पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीतपणे होऊन नागरिकांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे .कळवण शहरासाठी पूर्वी ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित होते आता त्यात १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण वाढविण्यात आल्यामुळे शहरासाठी २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित झाले आहे. सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना हीं ४० लिटर प्रतिव्यक्ती असून नवीन पाणी पुरवठा योजना १३० लिटर प्रति व्यक्तीने मंजूर झाली आहे. पूर्वीचे जलकुंभ हे ५.२५ लाख लिटर क्षमतेचे असून नवीन योजनेत १७.६५ लाख लिटर क्षमतेचे शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर येथे ३ नव्या जलकुंभ होणार आहे. जुने जलशुद्धीकरण केंद्राबरोबर या योजनेत संभाजीनगर मध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आल्यामुळे कळवणकर जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वातील योजना २० किमी लांबीची असून नवीन योजना १७ प्रभागात पाणी पुरवठा करणार असून तिची लांबी ३८ किमी असणार आहे.
पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत
कळवण शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध योजनेतून कळवण शहराला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेतली. पुढील २५-३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरुन नवीन योजनेच्या प्रस्तावास २५ कोटीच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळवली. हीं योजना लवकरच कार्यान्वीत होवून शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
– आमदार नितीन पवार, कळवण
योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश
कळवण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाचे गिरणा नदीपात्रातील उदभव उन्हाळ्यात कोरडेठाक पडतात. त्यामुळे चणकापूर प्रकल्प स्थळावरून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनस्तरावर दाखल होता. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश आले
– कौतिक पगार,
गटनेते, कळवण नगरपंचायत