विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट
कळवण – महाराष्ट्र विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात कळवण तालुक्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयात मिळत असलेल्या सेवाबाबत समाधान व्यक्त करुन आरोग्य यंत्रणेचे कौतुक करुन २०० खाटांच्या अद्यावत रुग्णालय उभारणेकामी शासनस्तरावर आमदार नितीन पवार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस राज्य सरकारला करणार असल्याचे समितीचे सदस्य आमदार डॉ तुषार राठोड यांनी सांगितले.
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कामे, आश्रमशाळा, वसतिगृह, निधी संदर्भात आढावा घेत शासकीय आश्रमशाळा मोहनदरी येथे भेट देऊन पाहणी केली. कळवणच्या उपजिल्हारुग्णालयास समितीने भेट देऊन रुग्णालयातील विविध कक्षाच्या भेटी दरम्यान अपघात कक्षातील स्वच्छता , सुसज्ज अतिदक्षता कक्ष ,शस्त्रकिया गृह , प्रसूतीपश्चात सेवा विभागातील स्वच्छता व व्यवस्थेची पाहणी करुन समाधान व्यक्त करुन आतापर्यंत पाहणी केलेल्या रुग्णालयामध्ये कळवणचे उपजिल्हा रुग्णालय सर्वार्थाने सर्वात्कृष्ट असल्याचे आमदार डॉ राठोड यांनी सांगितले शिवाय सदस्यांनी अभिप्रायसुद्धा नोंदविला .
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, नॉन कोविड विभागाची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस करीत आरोग्य सुविधा मिळतात की नाही याची खातरजमा केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.कळवण सारख्या आदिवासी भागात सर्व सुविधा युक्त आरोग्य यंत्रणेची उपजिल्हा रुग्णालयात उभी केली. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम असल्यामुळे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय जनतेसाठी आधारवड ठरले असल्याचे सांगून वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार व यंत्रणेच्या कामकाजाचे कौतुक केले. समिती सदस्यांसमवेत अवर सचिव काकड ,प्रतिवेदक शिंदे, तहसीलदार बी. ए. कापसे ,सहाय्यक प्रकल्पधिकारी पंकज बुरकुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर , तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुधीर पाटील वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनंत पवार , पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.