कळवण – गेल्या चार महिन्यापूर्वी रुग्णांअभावी कळवण उपजिल्हा रुग्णालयात रिकामे बेड आणि आज रुग्ण दाखल करायला बेड शिल्लक नसल्याचे चित्र बघून रुग्णालयातील कामाचा दर्जा सुधारल्याचे निदर्शनास आल्याने आमदार नितीन पवार यांना सुखद धक्का बसला. सध्यास्थितीतील रुग्णालयातील कामकाजाचे कौतुक करुन यंत्रणेवर शाबासकीची थाप मारुन चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देत आदिवासी भागातील या रुग्णालयात जागतिक दर्जाचे कामकाज व्हावे यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी बैठकीत दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला तेव्हा प्रसूतीसाठी येणाऱ्या भगिनीसाठी आवश्यक त्या सेवा उपलब्ध असून केवळ बेड कमी पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची सेवा चांगल्या पद्धतीने केली जाते किंवा नाही याची खातरजमा आमदार पवार यांनी महिला व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून केली आणि प्रसूती विभागाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्पदंश, विषप्रयोग, हृदयविकार यासारख्या तात्काळ सेवा रुग्णांना देण्यासाठी लस,पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मृत्युदर कसा कमी राहील याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.लहान बालंकासाठी कोविड उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून कार्यान्वित करा, ऑक्सिजन टंचाई भासणार नाही याचे नियोजन करून 7 दिवसात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करुन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांना दिल्या.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णालयाला आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सुविधा आणि औषधे, साहित्य सामग्री खरेदी यासाठी महसूल निर्माण करणे व जास्तीत जास्त रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देणे याबाबाबत स्वतंत्र व्यवस्था राबविण्याची सूचना आमदार पवार यांनी बैठकीत केली. रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित होणार असल्यामुळे व रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन मधून जनरेटर व 6KL क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक मंजूर केल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले.
रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय यंत्रणा सक्षम असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालय जनतेसाठी आधारवड असल्याने सर्व अडचणी सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील, रुग्ण सेवेबाबत तक्रार येणार नाही या दृष्टीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले. रुग्णालयातील नियोजित ऑक्सिजन प्लांट,विविध विभागांना भेट देऊन आमदार नितीन पवार यांनी प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली . प्रशासनाचे वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार यांनी शाल श्रीफळ देऊन आमदार नितीन पवार व ऋषिकेश पवार, राजेंद्र भामरे यांचे स्वागत केले. यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ निलेश लाड, डॉ पराग पगार डॉ प्रल्हाद चव्हाण , डॉ दीपक बहिरम, डॉ धामणे, डॉ गोडबोले, डॉ चौरे, कुणाल कोठावदे , योगेश भोये, संदीप सूर्यवंशी,रवींद्र शिवदे ,विकास थोरात आदी उपस्थित होते .
चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा
कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात अल्प किंमतीत चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळते त्यामुळे रुग्ण संख्या वाढल्यामुळे १०० बेड कमी पडतात. त्यांचे २०० खाटाच्या सामान्य रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यास प्रयत्नशील असून सुरगाणा येथे उपजिल्हा रुग्णालय व उंबरठाण येथे ग्रामीण रुग्णालय कार्यन्वित करणार.
– आमदार नितीन पवार, कळवण