कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्थेकडून मदत
कळवण – अभोणा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधून पाळे बु येथील संजय देशमुख व त्यांच्या मातोश्री सुमनताई देशमुख यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सक्रीय झाले. या निमित्ताने कोवीड सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेचा शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान करीत देशमुख कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त करुन कोविड सेंटरला कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्थेच्या वतीने २१ हजार रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
कळवण तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्यामुळे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. या स्थितीत सामाजिक संस्था, संघटना, दानशूर व्यक्तीनी कोविड सेंटरला सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार यांनी नुकतेच केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्थेच्या वतीने संजय देशमुख यांनी कोविड सेंटरला आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी २१ हजार रुपयांची मदत करुन सामाजिक बांधिलकीचे जोपसण्याचे उदाहरणं समाजासमोर ठेवले.
संजय देशमुख व त्यांच्या मातोश्री यांनी अभोणा कोविड सेंटरमधून उपचार घेऊन कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांना कोविड सेंटरमध्ये डॉक्टर व नर्स यांची अविरत सेवा, प्रयोगशाळा कर्मचारी, औषधनिर्माण अधिकारी, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी समुपदेशक, कक्षसेवक, रुग्णवाहिका वाहनचालक, सफाईगार कोविड सेंटरमध्ये महत्वाची भूमिका अनुभवाला आली. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ दीपक बहिरम, डॉ पुरुषोत्तम खंबाईत,डॉ आशिष बिसने,डॉ जगदीश जाधव ,डॉ अमोल चौरे,डॉ पुनम भोये,डॉ मनोज सूर्यवंशी,औषधनिर्माण अधिकारी श्रीमती मनिषा साबळे, रोहित पाटील यांचा कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी सेवा संस्थेच्या वतीने संजय देशमुख यांनी सत्कार करुन सन्मान केला.यावेळी संजय देशमुख, अनुप आहेर, वैभव बच्छाव, तुषार देशमुख ,प्रतिक धांडे, सुनिल बच्छाव, अरुण वार्डे आदी उपस्थित होते.