कळवण – कळवण तालुक्यातील चणकापूर येथील टेकडीवर सन १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना वंदन करुन आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देत क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन चणकापूर येथील हुतात्मा स्मारकस्थळी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने वीर हुतात्म्यांचे स्मरण दरवर्षी चणकापूर येथे होत असते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ चणकापूर येथे शासनाने हुतात्मा स्मारकाची उभारणी केली आहे. १९३० च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या प्रतिमेला आमदार नितीन पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देत अभिवादन करण्यात आले.चणकापुरसह गंगापूर,नांदूरी,वंजारी,अंबिका ओझर,साकोरे,आठंबे,इन्शी आदी गावात आदिवासी क्रांतिकारकांचे प्रतिमापुजन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावरील अतूलनिय प्रेम, विश्वास,स्वाभिमान,सत्य,सचोटी, चिकाटी,आणि प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस असल्याने या आदिवासींच्या गुणांचा गौरव व्हावा,त्यांना त्यांच्या हक्काची कर्तव्याची जाणीव व्हावी या मुख्य उद्देशाने युनोने घोषित केल्यापासून अलीकडे शासकीय स्तरावर, व प्रामुख्याने आदिवासी बहूल भागात ९ आँगष्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या साजरा करण्यात येतो. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते यशवंत गवळी,तहसीलदार बंडू कापसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आदिवासी सेवक डी.एम गायकवाड, ज्ञानदेव पवार, ऋषीकेश पवार,हरिश्चंद्र देसाई,भाई दादाजी पाटील, शिवाजी चौरे,भगुर्डीचे सरपंच दत्तात्रेय गवळी,कमल पवार, सुमन बहीरम,मंडळ अधिकारी मदन करवंदे आदि.मान्यवर उपस्थिती होते. आदिवासी सेवक डी.एम गायकवाड यांनी जागतिक आदिवासी दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज बागुल, प्रभाकर बागुल,अशोक पवार, केशव भोये,विलास भोये,सागर गायकवाड आदिंनी परीश्रम घेतले.