-जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आमदार नितीन पवार यांना आश्वासन
– वळण योजनेसाठी जमीन भूसंपादन करतांना समृद्धी महामार्गाप्रमाणे हेक्टरी दर निश्चित करावा – आ. पवार
कळवण – नार-पार औरंगा-अंबिका या पश्चिम वाहिनी खोऱ्यात उपलब्ध पाण्यापैकी १०.७५ टी.एम.सी. पाणी वळविण्यात येणार असल्याने स्थानिक आदिवासींच्या भविष्याचा विचार करुन सुरगाणा तालुक्यासाठी ३० टक्के पाणी राखीव ठेवण्यासाठी आमदार नितीन पवार आग्रही असल्यामुळे सुधारित सर्वेक्षण करुन किमान ३० टक्के पाणी स्थानिकांना राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा मंत्री यांनी यंत्रणेला दिले. प्रस्तावित नार-पार वळण योजना आणि मृद व जलसंधारण विभागाच्या विविध सिंचन प्रश्नांसंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत वळण योजनेसाठी जमीन भूसंपादन करतांना शासकीय दर कमी असल्यामुळे समृद्धी महामार्गाप्रमाणे हेक्टरी दर निश्चित करावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी जलसंपदामंत्री पाटील यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी नामदार पाटील यांनी दिले.
नार- पार नदीजोड वळण योजना तसेच सन २०१२ पासुन प्रलंबित असलेल्या मृद व जलसंधारण विभागाकडील सिंचन योजना, सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन प्रकल्पासह दुमीपाडा धरणाचा प्रश्न संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. नार-पार औरंगा-अंबिका या पश्चिम वाहिनी खो-यात ३१.११ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असुन त्यापैकी १०.७५ टी.एम.सी. पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित आहे.सुरगाणा तालुक्यासाठी केवळ १५ टक्के पाणी राखीव ठेवण्याचे नियोजित असल्याने त्यात बदल करुन स्थानिक आदिवासींच्या भविष्याचा विचार करुन वळविण्यात येणा-या पाण्यापैकी ३० टक्के पाणी हे सुरगाणा तालुक्यासाठी राखीव ठेवण्याची आग्रही मागणी आमदार नितीन पवार यांनी केली. सिंचन क्षेत्र विचारात घेऊन सुधारित सर्वेक्षण करुन किमान ३० टक्के पाणी स्थानिकांना राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा मंत्री पाटील यांनी तात्काळ यंत्रणेला दिले. सुरगाणा तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे प्रमाण कमी असल्याने वळण योजना राबवितांना भूसंपादन करण्यात येणा-या जमिनीस प्रति हेक्टरी शासकीय देय दर अत्यंत कमी आहे त्यात वाढ करुन जमीनधारकांना विशेष बाब म्हणून समृद्धी महामार्गाप्रमाणे हेक्टरी दर निश्चित करावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी करुन जलसंपदामंत्री पाटील यांचे लक्ष वेधले असता सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी नामदार पाटील यांनी दिले.
वळण योजना राबविण्यापूर्वी सन २०१२ पासुन प्रलंबित असलेल्या साठवण तलाव सोनगीर,बाळओझर, ल.पा.योजना वाघधोंड, मालगोंदा, सालभोये व उंबरविहीर योजना पुर्ण करण्यासाठी या योजनांचे काटछेद संकल्पन तात्काळ द्यावे अशी मागणी आमदार पवार यांनी केली. तात्काळ देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे सचीव व नाशिक मेरीचे महासंचालक यांना नामदार पाटील यांनी दिले तसेच २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या २२ योजनांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नार-पार योजनापूर्वी सुरगाणा तालुक्यातील लघु बंधारे,पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट गेटेड बंधारे बांधण्याबाबत प्रथम प्राधान्याने प्रयत्न करावे यासाठी आमदार नितीन पवार यांनी बैठकीत आग्रह धरल्याने जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांना नामदार पाटील यांनी याबाबत निर्देश दिले. बैठकीस आमदार नितीन पवार,जलसंपदा विभागाचे सचीव , गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ,ठाणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव या महामंडळाचे कार्यकारी संचालक, महासंचालक, मेरी नाशिक, सहसचिव तथा मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई तसेच जलसंपदा व जलसंधारण विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यासाठी मी आग्रही आहे.
सुरगाणा तालुक्यात सिंचन योजना नसल्याने फक्त १ टक्के सिंचन होते.त्यामुळे येथील आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करतो. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नार-पार योजनापूर्वी सुरगाणा तालुक्यातील लघु बंधारे,पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट गेटेड बंधारे बांधण्याबाबत सरकारने प्रथम प्राधान्याने प्रयत्न द्यावे यासाठी मी आग्रही आहे.
-आमदार नितीन पवार