आमदार नितीन पवार यंत्रणेवर संतप्त , रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजण्याच्या सूचना
कळवण – कळवण शहरातील मेनरोडच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे कळवणकर जनतेमध्ये असंतोष आहे. या असंतोषाचा उद्रेक आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात होऊन आमदार नितीन पवार यांनी संबंधित यंत्रणा आणि काम करणाऱ्या एजन्सीला चांगलेच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केल्याने यंत्रणा निरुत्तर झाली.
कळवण तालुक्यात रस्ता कामात दिरंगाई खपून घेणार नाही. नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत जनतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सब ठेकेदाराची मनमानीने दिरंगाईला आमंत्रण दिल्याचे समोर येताच संतप्त झालेल्या आमदार पवारांचा रुद्रावतार पाहून उपस्थित देखील काही काळ आवाक झाले.
कळवण शहरातील मेनरोडचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करा अन्यथा १ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा देत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजण्याच्या सूचना करुन रस्ता कामाचे नियंत्रण नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली.आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सोनग्रा यांची कळवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, दिगंबर रायते, चंद्रकांत कोठावदे, गंगाधर गुंजाळ, भूषण पगार, उमेश सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन निवेदन दिले.
कळवण शहरातील मेनरोड हे शहराचे नाक आहे मात्र गेल्या सहा सात वर्षांपासून कळवणकर जनता नाहक त्रास सहन करीत आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये कळवणकर जनतेला खड्ड्यातून प्रवास करावा लागला. मात्र गेल्या दीड दोन वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला अत्यंत धिम्यागतीने सुरुवात झाली आहे. कामाला गती नसल्याने कळवणकर जनता वैतागली आहे.
नामपूर -सटाणा -कळवण -वणी या हायब्रीड अन्यूइटी अंतर्गत होणाऱ्या रस्त्यामध्ये कळवण नगरपंचायत हद्दीतून जाणारा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्या अखत्यारीत गेलेल्या नामपूर –सटाणा-कळवण –वणी राज्यमार्ग २० या कळवण शहरातून जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. अवघ्या एक किलोमीटरचे काम गेल्या दीड दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरु असून ठेकेदाराच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार कामाला सुरुवात होते, शासकीय यंत्रणेचा कुठलाही अंकुश नसल्याने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला कळवणकर जनता वैतागली असून या कामाबद्दल कळवणकर जनतेबरोबर व्यापारी महासंघाच्या पदाधिकारीनी आपली तीव्र नाराजी आमदार नितीन पवार व सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडे व्यक्त केली होती.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळवण शहरातील मेनरोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याचे दुतर्फा काँक्रीटीकरण काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत संथ गतीने सुरु असलेल्या या रस्त्याचे काम आठ आठ दिवस बंद असते, मशीनरी उभी असते त्यामुळे रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने कळवणकर जनतेला एकतर्फी वाहतुकीचा वैताग आला आहे.
रस्त्यावर एकदा खड्डे केले की १५ दिवस कुणीही ढुकून पहात नाही त्यामुळे राम भरोसे चाललेल्या या कामावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कधीही कामावर दिसून आली नसल्याने कामाला गती मिळाली नाही.कळवण शहराच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा व प्रमुख रस्ता म्हणून ज्याची ख्याती आहे अशा मेनरोडच्या अवघ्या एका किलोमीटर च्या रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण व सुशोभीकरणास दोन वर्षांहून अधिक काळ झाला मात्र कामात प्रगती नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिक घटकांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही तर कळवण शहरातील सर्व व्यावसायिक, शेतकरी, वाहनधारकांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनद्वारे देण्यात आला आहे.