अकार्यक्षम सरकारमुळे ओबीसीना आरक्षणापासून दूर जावे लागले – आहेर
कळवण – राज्यातील महाविकास आघाडीचे तीन चाकी अकार्यक्षम सरकार मुळेच बहुजन समाजाला आरक्षणापासून दूर जावे लागले असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी करुन महाविकास सरकारच्या कारभारावर टीकास्र सोडले.
भारतीय जनता पार्टी, ओबीसी आघाडीच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी कळवण एसटी बस स्थानकाजवळ भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी आहेर बोलत होते. यावेळी कळवणचे नायब तहसीलदार डॉ व्यंकटेश तृप्ते यांना भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष प्रभाकर निकम, नंदकुमार खैरनार,विकास देशमुख,सुधाकर पगार यांच्या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षण संदर्भात निवेदन दिले.
राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या भावनांचा अंत न पाहता तत्काळ राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून एप्मिरिकल डाटा गोळा करून ओबीसी समाजाचे केलेले आरक्षण परत द्यावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी यावेळी केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपाच्या अचानक झालेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक एकतर्फी चालू आहे. त्यात रस्ता रोको आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली.
यावेळी शहराध्यक्ष निंबा पगार, गोविंद कोठावदे, काशिनाथ गुंजाळ, सचिन सोनवणे, डॉ अनिल महाजन,विश्वास पाटील,हितेश पगार,कृष्णा पगार, सतीश पगार, रामकृष्ण पगार, चेतन निकम, कृष्णकांत कामळस्कर, नाना खैरनार, राजेंद्र पाटील,दीपक जाधव,मनोहर बोरसे आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.