मानूर व अभोणा सेंटरला मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीचा अभाव
…
कळवण – कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचण्या आणि वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढविण्याची गरज आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभोणा व मानूर कोविड सेंटरला मनुष्यबळ, ऑक्सिजन व रेमडेसिव्हर इंजेक्शनचा अधिक पुरवठा करुन द्यावा नाहीतर कोविड सेंटरलाच कुलूप लावू अशा इशारा आमदार नितीन पवार यांनी आज कळवण येथे दिला.
मानूर कोविड सेंटरला आमदार पवार यांनी भेट देऊन मानूर व अभोणा कोविड सेंटरमधील उपाययोजना संदर्भात तहसीलदार बी ए कापसे, गटविकासधिकारी डी एम बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शरदचंद्र परदेशीं, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रल्हाद चव्हाण यांच्याशी चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. आमदार पवार यांनी कोविड सेंटरमधील अडचणी संदर्भात जिल्हा यंत्रणेकडे पाठपुरावा करुन जनतेला आरोग्य सुविधा आणि कोविड सेंटरला वैद्यकीय यंत्रणा, मशीनरी, मनुष्यबळ उपलब्ध देण्याच्या सूचना केल्या. सुविधा उपलब्ध झाल्याच नाहीतर कोविड सेंटरला आपणच कुलूप लावू असा इशाराच आमदार पवार यांनी यावेळी बोलतांना दिला.
तालुक्यात जास्त रूग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीने चाचण्या करा. संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवा. आरोग्य यंत्रणेने स्वत:हुन लोकांपर्यंत जाऊन संपर्क करत विश्वासाचे वातावरण निर्माण करून गावांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी जिल्हा परिषद तसेच महसूल यंत्रणांची मदत घेऊन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे.कोरोना संसर्गला रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेची अधिक व्यापक अंमलबजावणी करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली.
आमदार नितीन पवार यांनी कळवण शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या यंत्रणेशी चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. खासगी कोविड सेंटर उभारणीसाठी शासकीय पातळीवरील सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन ऑक्सिजन व रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सहकार्य करु असे आश्वासन यावेळी दिले.. यावेळी तहसीलदार बी ए कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कमको उपाध्यक्ष नितीन वालखडे आदी उपस्थित होते.
प्रशासनाची चिंता वाढली
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, अशी स्थिती आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला. यामुळे फायदा झाला.कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत भयावह स्थितीत पोचली आहे. वाढत्या संसर्गाने प्रशासनाची चिंता वाढली आहे.