सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार ,आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नांना यश
कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या सहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. या परिसरातील २० गावांना दिलासा मिळाला असून आमदार नितीन पवारांना या भागातील बिकट अशा पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना या निमित्ताने यश येणार आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पातील पाईप विमोचक दुरुस्तीच्या कामाकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधत दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते याकडे बैठकीत लक्ष वेधले होते. त्यावेळी नामदार पाटील यांनी युध्दपातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या सहाय्याने आज युध्दपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या 2/3 दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान आज पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.
गुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावनारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे पाणी गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व ए टी पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू ल पा प्रकल्प बांधून पाणी अडविले.तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहीनी नदीचे पाणी पुर्व वाहीनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवाना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री स्व ए.टी. पवार यांनी सन २०००मध्ये प्रयोग यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते.
जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधुन पाणी येणे बंद झाले.पाटबंधारे विभागाच्या यांत्रीकी विभागाकडून तपासणी करून पाण बुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले परंतु त्यांना यश आले नव्हते त्यामुळे या पाण्यापासून विरशेत मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचीत झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.
पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल,मे जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते.शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो.दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या.दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वाना पाणी मिळेेेेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.