आमदार नितीन पवारांकडून नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी
कळवण – कोरोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठलेही गैरसमज, अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, ज्या ग्रामपंचायत हद्दीत १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण होईल त्या ग्रामपंचायतला विकासकामांसाठी १५ लाख रुपये उपलब्ध करुन देण्याची घोषणा आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुका दौऱ्यात केली.
तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेसमवेत नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन आदिवासी बांधवाना दिलासा दिला. चक्रीवादळामुळे घरांचे तसेच आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला देऊन पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन अहवाल शासनस्तरावर सादर करण्याची सूचना यावेळी आमदार पवार यांनी केली.
सुरगाणा तालुक्यातील सुकतळे, हस्ते, सांबरखल,बरडा,दाबाडमाळ ,रोंगाणे,म्हैसमाळ,शिरीषपाडा,दांडीचीबारी, वडपाडा, माणी, खडकमाळ, पळसन, म्हैसखडक,देविपाडा, उंबरठान,मांधा पांगारणे, गोंदूणे आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त घर व फळबाग यांना भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
या आदिवासी बहुल भागातील दौऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली का ? याबाबत अनेक आदिवासी बांधवाना त्यांनी विचारणा केली. अनेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आले. लसीकरणाबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात आले असून मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्याकडे समोर जीवंत उभा आहे त्यामुळे गैरसमज करुन न घेता लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आमदार पवार यांनी ठिकठिकाणी भेटीप्रसंगी केले.
सुरगाणा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत हद्दीत १०० टक्के लसीकरण करण्यात येईल त्या ग्रामपंचायतला विकास कामांसाठी १५ लाख रुपये निधी विकासकामासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी दौऱ्यात सुरगाणा तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रणवीर, तालुका कृषी अधिकारी श्री.रहाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, प्रमुख पदाधिकारी व नुकसानग्रस्त भागातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.