बांधावर खते व बियाणे मिळणार, गावोगावी नियमांचे पालन करुन प्रशिक्षण
कळवण – खरीप हंगामातील पिके, बियाणे, पेरणी, लागवड, खते, फवारणी आदी शेती विषयक कामांची माहीती देऊन विविध योजनांचे मार्गदर्शन तालुका कृषी यंत्रणेने कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना करावे अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी कृषी विभागाला केली असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची यंत्रणा आता कळवण तालुक्यात गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन खरीप हंगामातील पीकलागवडीसह खते व बियाणे बाबत मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीची परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके, खते, बियाणे, पेरणी , मशागत आदी शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन करणे आवश्यक असल्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने २३ ते २४ मे दरम्यान शेतीविषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याचे नियोजित केले आहे.
खरीप हंगामपूर्व नियोजनात भात लागवड तंत्रज्ञान, चारसुत्री भात लागवड तंत्रज्ञान, एकात्मीक किड व्यवस्थापन, गटशेती,मुलस्थानी जलसंधारण, प्रधानमंत्री पिक विमा योजना,फलोत्पादन, समूह आधारित कृषि विस्तार कार्यक्रम , मृदा चाचणी व जमीन आरोग्य पत्रिका,टोळधाड नियंत्रण, खरीप पिकांची बीजप्रक्रीया,१० टक्के खताची बचत बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकरी बचत गट यांना बांधावर खते,बियाणे,बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी,एक गाव एक वाण,शेतीशाळा,रिसोर्स बॅक,मग्रारोहयो अंतर्गत बांधावर वृक्ष लागवड,सलग लागवड,गांडुळ युनिट,नॅडेफ ,शेततळे,तुती लागवड,भातासाठी युरीया ब्रिकेट्चा वापर, ठिबक सिंचन,वृक्ष लागवड पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका, महाडीबीटी आदी विविध योजनांचे कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करुन गावनिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती देण्यात येणार आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी गावोगावी होणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी आवाहन केले आहे.