कळवण – चालू हंगामात खत उत्पादक कंपन्यांनी खतांची दरवाढ केलेली आहे. परंतू तालुक्यातील खत विक्रेत्यांनी जुना खतसाठा जुन्याच दराने विक्री करणे बंधनकारक असेल.ज्यादा दराने खत विक्री केल्यास खत नियंत्रण कायदयानूसार विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहीती तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणनियंत्रण निरीक्षक विजय पाटील यांनी दिला.
दरम्यान खत विक्रीचा कळवण तालुक्यात काळा बाजार होऊ नये या पार्श्वभूमीवर तालुक्यात भरारी पथक तैनात करण्यात आले असून हे पथक खत विक्रेत्याच्या खत विक्री, बियाणे कारभारावर नजर ठेवून असणार आहे. केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीएंट बेस्ड सबसिडी) धोरणानूसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीला आहेत.कच्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याचा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी,एमओपी,एसएसपी व संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ केली आहे.
कळवण तालुक्यातील बर्याच खत विक्रेत्यांकडे जूना व नवीन खत साठा उपलब्ध असणार आहे.त्यामुळे रासायनिक खतांची चढया दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी खत विक्रेत्यांनी दुकानांबाहेर दर्शनी भागात शिल्लक खत साठा व दर फलक लावणे बंधनकारक असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. खत विक्रेत्यांनी नवीन दराने खत विक्री केल्यास विक्री पावतीवर जूना खत साठा शिल्लक नसल्याने लिहून देणे बंधनकारक असेल जूना खत साठा शिल्लक असताना कोणीही नवीन अथवा चढया दराने खत विक्री करू नये.याबाबत आढळून आल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास खत विक्रेत्यावर खत नियंत्रण कायदयानूसार कारवाई करण्यात येणार आहे.
कळवण तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांवर तालुका गुणनियंत्रण भरारी पथकाव्दारे नजर ठेवणार असून भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.शेतकरी बांधवांनी ई-पास मशिनच्या पावतीवरील खतांचे दर व खताच्या गोणीवरील खतांचे दर तपासून घ्यावेत .यामध्ये जर तफावत आढळली तर कृषि विभागाशी संपर्क साधावा, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि सेवा केंद्गांवर गर्दी न करता गटांमार्फत खते,बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर खते या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गट यांना रासायनिक खत देसराणे ,इन्शी,व विसापूर या गावांत कंपनी दरात वितरकामार्फत पोहोच झालेले आहे तसेच तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे बचत गट असतील त्यांनीही या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.