– आमदार नितीन पवारांकडून वचननाम्याची वचनपूर्ती
– ५० गावे व वाड्यावस्तीवर सुरळीत वीज मिळणार
कळवण – विधानसभेच्या निवडणुकीत आमदार नितीन पवार यांनी खर्डेदिगर व जिरवाडे(ह) परिसरातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी वीज उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावून परिसरातील ५० गाव वाडया वस्तीवरील वीज प्रश्न सोडवून असे वचन दिले होते.या वचननाम्याची वचनपूर्ती झाली असून
खर्डेदिगर व जिरवाडे (ह) येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिल्यामुळे परिसरातील वीजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
खर्डेदिगर येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये तर जिरवाडे (ह) येथील वीज उपकेंद्रासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांची महावितरणने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे आता जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्यामुळे खर्डेदिगर व जिरवाडे (हं) परिसरातील ५० गाव, वाडया वस्तीवरील शेतकऱ्यांना अखंडित व हक्काची वीज मिळणार आहे.
खर्डेदिगर व जिरवाडे (ह) परिसरात सध्या मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याची ओरड आहे. वाढती वीजेची मागणी,वीज गळती, वीजचोरीमुळे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीपंपाना सुरळीत वीज मिळत नसल्याची कैफियत या भागातील शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान आमदार नितीन पवार यांच्या समोर मांडली होती. त्यामुळे प्रथम प्राधान्याने वीजेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले होते.
या संदर्भात महावितरणकडे प्रस्ताव दाखल करुन उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री छगनराव भुजबळ,आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी यांच्याकडे पाठपुरावा करुन आमदार नितीन पवार यांनी मंजुरी मिळवली,महावितरणचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मंजुरी दिली असून आदिवासी उपयोजनेतून निधी उपलब्ध झाल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.