कळवण – शहरातील मेनरोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच आता पावसाळा असल्याने ठिकठिकाणी पाणी साचणे, चिखल आणि अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिकही हैराण झाले आहेत. यासंदर्भात कळवण व्यापारी महासंघाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांसह, तहसिलदार, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांत, पोलिस अधिक्षक आदींना पत्र दिले आहे. हे काम जलदगतीने करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.
व्यापारी महासंघाने दिलेले पत्र असे
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आम्ही कळवण व्यापारी महासंघातर्फे आपणास नम्रपणे निवेदन करतो की,आपल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून कळवण शहरातील मेनरोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याचे दुतर्फा काँक्रीटीकरण काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही त्या कामाला संबंधित ठेकेदार व निविदा स्वीकारणाऱ्या एजन्सी कडून न्याय मिळालेला नाही.
धूळ,खड्डे,डागडुजी व आता काँक्रीटीकरण या सर्व दिव्यातून हा मेनरोड अद्यापही मोकळा श्वास घेऊ शकलेला नाही. याबाबत स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक, पादचारी व वाहनधारकांना या मुख्य रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. व्यावसायिकांचे व्यवसाय अर्थातच ठप्प आहेत.कळवण शहराच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा व प्रमुख रस्ता म्हणून ज्याची ख्याती आहे अशा मेनरोडच्या अवघ्या एका किलोमीटर च्या रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण व सुशोभीकरणास दोन वर्षांहून अधिक काळ लोटला जात असेल तर व्यावसायिक, रस्त्यावर अवलंबून असलेल्या घटकांच्या नुकसानीचे काय ? कोविड १९ च्या काळात मुळातच सर्व व्यवहार ठप्प होते आताशा कुठे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ घातले आहेत अशावेळी मुख्य रस्त्याची संबंधित ठेकेदार यंत्रणेकडून होणारी दिरंगाई व त्यामुळे होणाऱ्या त्रासाला आपले खातेच जबाबदार आहे. कळवण व्यापारी महासंघ व सर्वच व्यापारी, शेतकरी तसेच वाहनधारकांकडून या कामाच्या,कार्यपद्धतीचा आम्ही जाहीररीत्या निषेध करीत आहोत.
अलीकडे पावसाळा सुरू असून,संबंधितांना याविषयीचे निमित्त सापडू शकते हेही आम्ही जाणून आहोत.मात्र,लवकरात लवकर या संथगतीने व राणी भीमदेवीच्या थाटात सुरू असलेल्या कामाला गती मिळाली नाही तर कळवण शहरातील सर्व व्यावसायिक, शेतकरी, वाहनधारकांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.त्यानंतर होणाऱ्या परिणामांना आपले खाते जबाबदार राहील याचाही गांभीर्याने विचार करावा.तात्काळ याकामाला प्राधान्य देत कळवणकरांना दिलासा द्यावा म्हणून हा पत्रप्रपंच
कळावे
आपले नम्र
कळवण व्यापारी महासंघ
सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ,कळवण