कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन वर्षांपासून कळवण शहरातील मुख्य रस्त्यासह व्यापारी धूळ वाहतूक कोंडी यामुळे मरणयातना सहन करीत आहे. १५ मार्च रोजी व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनप्रसंगी ठेकेदाराने उर्वरित काम ४५ दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते मात्र ७७ दिवस उलटूनही काम अपूर्णच आहे. याकामाकडे सर्वानीच पाट फिरवली आहे. हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी दिला आहे.
मेनरोडचे काम संबंधित ठेकेदाराकडून संथगतीने सुरू आहे. अवघ्या एक किलोमीटर रस्त्यावर काँक्रीटीकरण करतांना होणारा विलंब हा येथील व्यावसायिकां वर अन्याय करणारा ठरत आहे. अर्धवट अवस्थेतील कामामुळे या रस्त्यावर पसरलेले धुळीचे साम्राज्य, वेळोवेळी अपघात होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम खाते व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. कोविड काळामुळे यापूर्वीच आर्थिक विवंचनेत सापडलेला लहान, मोठा व्यापारी या रस्त्याच्या थंडावलेल्या कामामुळे आर्थिक व शारीरिक ही बेजार झाला आहे. अनेकांना फुफुसांचे आजार जडले असून, रस्त्याच्या कामाची पद्धत पाहता स्थानिक व्यावसायिकांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
संबंधित ठेकेदाराकडून होणाऱ्या विलंबाबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यावरून काही दिवस काम सुरू होते तर अनेक दिवस ते विविध कारणांनी पुन्हा बंद पडते. सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराकडून हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने येथील व्यापारी संतप्त झाला आहे. व्यापारी वर्गाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार व्यापारी वर्ग आक्रमक बनलाआहे. त्यामुळे दि १५ मार्च २०२२ रोजी लोकशाही मार्गाने कळवण बंद ठेवून कळवण बसस्थानक समोर (अत्यावश्यक सेवा वगळता) तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात व्यापाऱ्यांतर्फे जि प च्या माजी अध्यक्षा जयश्री पवार ह्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी ठेकेदाराने व्यापारी बांधवांचा तुटलेले संयम पाहत ४५ काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वसन दिले होते. मात्र ७७ दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. असे असतांना काम थांबलेले आहे. हे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी दिला आहे. तर, रस्त्याच्या रखडलेले कामामुळे रस्त्यावरील धुळ दुकानातील मालावर बसत आहे. त्यामुळे मालाची पॅकिंग खराब होत आहे. ग्राहक हा माल खरेदी करीत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा माल पडून असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे व्यावसायिक तुषार पगार यांनी सांगितले आहे.
पावसाळा तोंडावर
पावसाळ्यापूर्वीचे मान्सून वारे वाहू लागले आहेत. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील सर्व धूळ खाद्य पदार्थ्यांचे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल्स मध्ये येत असल्याने सर्व पदार्थ खराब होत आहे. नागरिकांनाही धूळ बसलेले पदार्थ विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबणार असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.