कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन वर्षांपासून कळवण शहरातील मुख्य रस्ता असलेल्या मेनरोडचे काम संबंधित ठेकेदाराकडून संथगतीने सुरू आहे. या हलगर्जीपणावरोधात आता कळवणकरांनी एल्गार पुकारला आहे. त्यामुळेच येत्या मंगळवारी (१५ मार्च) लोकशाही मार्गाने कळवण बंद ठेवून कळवण बसस्थानक समोर (अत्यावश्यक सेवा वगळता) तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यास मोठा प्रतिसाद लाभण्याची चिन्हे आहेत.
अवघ्या एक किलोमीटर रस्त्यावर काँक्रीटीकरण करतांना होणारा विलंब हा येथील व्यावसायिकांवर अन्याय करणारा ठरत आहे. अर्धवट अवस्थेतील कामामुळे या रस्त्यावर पसरलेले धुळीचे साम्राज्य, वेळोवेळी अपघात होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम खाते व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. कोविड काळामुळे यापूर्वीच आर्थिक विवंचनेत सापडलेला लहान, मोठा व्यापारी या रस्त्याच्या थंडावलेल्या कामामुळे आर्थिक व शारीरिक दृष्ट्याही बेजार झाला आहे. अनेकांना फुफ्फुसांचे आजार जडले असून, रस्त्याच्या कामाची पद्धत पाहता स्थानिक व्यावसायिकांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून होणाऱ्या विलंबाबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यावरून काही दिवस काम सुरू होते तर अनेक दिवस ते विविध कारणांनी पुन्हा बंद पडते. सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराकडून हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने येथील व्यापारी संतप्त झाला आहे. यासंदर्भात व्यापारी वर्गाने तातडीने बैठक घेतली आहे. त्यात झालेल्या निर्णयानुसार येत्या मंगळवारी (१५ मार्च) लोकशाही मार्गाने कळवण बंद ठेवून कळवण बसस्थानक समोर (अत्यावश्यक सेवा वगळता) तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कळवणच्या व्यापारी बांधवांनी सतत सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हाकेला ओ देत कळवण बंद १०० टक्के यशस्वी केला आहे. कळवण चे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामस्थ, शेतकरी बांधव व व्यावसायिक सर्व घटक या हक्काच्या लढाईत सहभागी होतील ही खात्री व्यापारी वर्गाला आहे. दरम्यान, कळवणकरांच्या या निर्णयामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.