कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या तीन वर्षांपासून कळवण शहरातील मुख्य रस्ता असलेल्या मेनरोडचे काम संबंधित ठेकेदाराकडून संथगतीने सुरू आहे.अवघ्या एक किलोमीटर रस्त्यावर काँक्रीटीकरण करतांना होणारा विलंब हा येथील व्यावसायिकांवर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे मंगळवारी (१५ मार्च) व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने पुकारण्यात आलेल्या कळवण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिड तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे संबंधित यंत्रणा व ठेकेदाराकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली. येत्या ४५ दिवसात मेनरोडचे काम पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसे लेखी आश्वासन ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आंदोलकांना दिले आहे.
मेनरोडच्या अर्धवट अवस्थेतील कामामुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, वेळोवेळी अपघात होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सार्वजनिक बांधकाम खाते व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत असतांना व्यापारी वर्ग आक्रमक झाला.कळवण च्या व्यापारी वर्गाला पहिल्यांदाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे पाहून सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, शेतकरी, ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठींबा दिला.
डीवायएसपी अमोल गायकवाड, तहसीलदार बंडू कापसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार,नगराध्यक्ष कौतिक पगार,रवींद्र देवरे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या साक्षीने ठेकेदार व संबंधित यंत्रणेची महत्वपूर्ण बैठक होऊन ४५ दिवसात गुणवत्ता राखत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात शहरातील सर्वच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी महासंघाचे संचालक दिपक महाजन,महाराष्ट्र चेंबर्सचे विश्वस्त विलास शिरोरे,विजय जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार,माजी जि प सभापती रवींद्र देवरे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे,हेमंत पाळेकर ,बेबीलाल संचेती तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडून या आंदोलनाचे समर्थन केले.
कोविड काळामुळे यापूर्वीच आर्थिक विवंचनेत सापडलेला लहान,मोठा व्यापारी या रस्त्याच्या थंडावलेल्या कामामुळे आर्थिक व शारीरिक ही बेजार झाला आहे. अनेकांना फुफुसांचे आजार जडले असून,रस्त्याच्या कामाची पद्धत पाहता स्थानिक व्यावसायिकांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून होणाऱ्या विलंबाबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आमदार,खासदार,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यावरून काही दिवस काम सुरू होते तर अनेक दिवस ते विविध कारणांनी पुन्हा बंद पडते.सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराकडून हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने येथील व्यापारी संतप्त झाले. व्यापारी वर्गाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार व्यापारी महासंघाने १५ मार्च २०२२ रोजी कळवण बंदचे आवाहन केले होते. लोकशाही मार्गाने कळवण बंद ठेवून कळवण बसस्थानक समोर तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कळवण च्या व्यापारी बांधवांनी सतत सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हाकेला ओ देत कळवण बंद १०० टक्के यशस्वी केला आहे.याची जाणीव ठेवून कळवण चे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामस्थ, शेतकरी बांधव व व्यावसायिक सर्व घटक या हक्काच्या लढाईत सहभागी झाले होते.
तीन वर्षांचा कालावधी एका किलोमीटर च्या काँक्रीटीकरणासाठी लागत असल्याने ठेकेदाराला समोर हजर करण्याची भूमिका उपस्थितांनी मांडली असताच ठेकेदार हजर झाले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणा देत उपस्थितांनी संताप व्यक्त केला. यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिप माजी अध्यक्ष जयश्री पवार,नगराध्यक्ष कौतिक पगार,जि प माजी सभापती रवींद्र देवरे,बाजार समिती सभापती धनंजय पवार,भूषण पगार,विलास शिरोरे, दीपक महाजन,जयंत देवघरे यांनी सर्वांची समजूत काढून वातावरण शांत केले. कळवण मेनरोडचे काम येत्या ४५ दिवसात पूर्ण करुन खुला करण्याचे लेखी आश्वासन ठेकेदाराने दिले आहे.
पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, तहसीलदार बंडू कापसे,सार्वजनिक बांधकाम अधिकारी विसावे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वांच्या साक्षीने लेखी आश्वासन ठेकेदाराकडून देण्यात आले. त्यानंतरच व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने खुली केलीत.
यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष जयंत देवघरे, प्रकाश पाटील,रंगनाथ देवघरे,कुमार रायते,श्रीकांत मालपुरे, विजय बधान,नितीन वालखेडे,चंद्रकांत कोठावदे,लक्ष्मण खैरनार, संदीप पगार,कैलास पगार, देविदास अण्णा विसपुते,सागर खैरनार,उमेश सोनवणे,भरत आहिरे,रुपेश शिरोडे, गजानन सोनजे,हेमंत कोठावदे,शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील,भाजपचे सुधाकर पगार,डॉ अनिल महाजन,छावा तालुकाध्यक्ष प्रदीप पगार,माकपचे मोहन जाधव,टिनू पगार,राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, आदिसह शेकडो व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक समाधान नागरे,उपनिरीक्षक बबन पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.