कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे सैनिक होते. मराठा, रामोशी, कोळी, मुस्लीम, बेरड, दलित, माळी यासह विविध समाजातील सैन्याचा त्यात समावेश होता. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं, ते कोणत्याही धर्मावर आधारित नव्हतं. त्यांनी रयतेचे राज्य उभं केल होते. त्यामुळे कुठल्याही एका जातीच्या चौकटीत त्यांना उभं करून धर्मा धर्मात वाद निर्माण करू नये असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कळवण येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कळवण तालुक्याच्या वैभवात भर घालणारा, उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच असा २१ फुटी पुतळा जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या सिद्धहस्त शिल्पकलेतून साकार झाला आहे. या ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याबद्दल कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती व शिवप्रेमीचे आभार मानले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार अॅड.माणिकराव कोकाटे, माजी आमदार हेमंत टकले, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, प्रख्यात शिल्पकार अनिल राम सुतार, नगराध्यक्ष कौतिक पगार, हभप संजय धोंडगे, शिवचरित्र व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना सरकारी सुविधा देणारा पहिला राजा म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, असा आदेश सैन्याला दिला. त्यामुळे लुटालूट करणारे सैन्य, सरदार, वतनदार ही प्रतिमाच बदलली. सैनिकांच्या घोड्याने जरी शेतकऱ्यांच्या शेतीतला पालेभाज्या खाल्ला तरी त्या शेतकऱ्याला भरपाई देण्याचे आदेश शिवाजी महाराज यांनी दिले होते. एखाद्या वर्षी समजा शेतकऱ्यांचे नुकसान झाले मग ते नैसर्गिक असु की युद्धाने असो त्यावर्षी महाराज शेतकऱ्यांचा सारा माफ करुन टाकायचे आणि शेतकऱ्याला पुन्हा उभे करायचे याची आठवण त्यांनी करून दिली.
Kalwan Chhatrapati Shivaji Maharaj Statue