कळवण – पुनंद प्रकल्प अंतर्गत चणकापूर उजवा कालवा पोखऱ्या डोंगरांजवळ २३ किमी अंतरावर नवीबेज शिवारात फुटल्यामुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नाल्याद्वारे वाहणारे पाणी शेतपिकांमध्ये घुसल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आमदार नितीन पवार यांनी भेट घेऊन दिलासा दिला.कालवा फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांकडून घेऊन शासन निर्देशानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार पवार यांनी देऊन चणकापूर उजवा कालव्यावर नियंत्रण असणारे गिरणा नदी खोरे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला अहवाल सादर करण्याची सूचना केली.
कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा वस्तुनिष्ठ पंचनामा महसूल विभागाकडून करुन घेण्याची सूचना आमदार नितीन पवार यांनी पुनंद प्रकल्पाचे उपअभियंता विजय टिळे यांना यावेळी केली. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले. कालवा फुटला त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा,पूरपाणी बंद झाल्यानंतर कालव्याची दुरुस्ती करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली. कालव्याजवळील नाले बुजल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. बुंजलेले नाले पुन्हा प्रवाहीत करुन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूचे नाले /चाऱ्या बुंजल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
नवीबेज शिवारात ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चणकापूर उजव्या कालव्याच्या आतील बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणच्या आतील भागाला मोठे भागदाड पडल्याने परिसरातील ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. रात्री अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. या पाण्यामुळे पाटाखालच्या शेतातील उभी पिके, अति पाण्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या कांदाचाळीत व घरात पाणी शिरले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील मका , कोबी , सोयाबीन , तुवर , द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे . तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी घुसले होते.यावेळी राजेंद्र शिंदे, रामकृष्ण पगार, रामदास पगार, नंदकुमार पगार, उमेश पगार ,भावराव पगार ,संतोष पगार, सागर शिंदे ,रोशन पगार ,पंकज शिंदे, जितेंद्र शिंदे ,नितीन शिंदे, गोकुळ शेवाळे ,ललित शिंदे, भाऊसाहेब आहेर ,प्रवीण आहेर, सचिन रौंदळ नीरज पगार, पवन पगार,गोपाळ शिंदे , दत्तू पगार , अशोक शिंदे , जयेश शिंदे , गौरव शिंदे , , महादू आहेर, सुरेश शिंदे आदि शेतकरी उपस्थित होते