भोपाळ (मध्य प्रदेश) – ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे. तसेच रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ते फरार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालिचरण यांच्या अटकेला मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ही बाब देशभरात चर्चेची ठरत आहे.
कालीचरण महाराजांविरुद्ध रायपूरच्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले की, रायपूर पोलिसांना खजुराहो येथील हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्याने आपले सर्व मोबाईल बंद केले होते. पहाटे चार वाजता पोलिसांनी हॉटेल गाठून त्यांना अटक केली. आता कालीचरण महाराजांना रायपूरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कालीचरण महाराज मध्य प्रदेशातील खजुराहोपासून २५ किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. आज पहाटे ४ वाजता रायपूर पोलिसांनी त्याला अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपीसह रायपूरला पोहोचले, असेही एसपी प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, कालीचरण यांच्या अटकेवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश पोलिसांना न कळवता अटक करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय कायदा याला अजिबात परवानगी देत नाही. त्यामुळेच यासंदर्भात मी आमच्या डीजीपींना छत्तीसगडच्या डीजीपींशी बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कालीचरण यांचा वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ
https://twitter.com/TheSanatanUday/status/1475417996034076674?s=20
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या दिल्लीत असून त्यांनी सांगितले की, जर कोणी अशा महापुरुषाबद्दल विशेषतः महात्मा गांधी यांच्या विषयी अशोभनीय टिका – टिप्पणी केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे छत्तीसगड पोलिसांनी ही योग्य कारवाई केली आहे. तसेच कालीचरण महाराजांच्या कुटुंबीयांना व वकिलाला कळवण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर रायपूरसह देशातील अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल संध्याकाळीच कालीचरण महाराज रायपूरहून निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्याचा शोध सुरू केला.