नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय कलावर्तुळात सन्मानाचे स्थान असलेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स , मुंबई (NCPA) या संस्थेने २०२२-२३ या वर्षासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या “दर्पण” या मराठी नाट्यलेखन उपक्रमातील विजेत्या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित “कलगीतुरा” या एनसीपीएनिर्मित प्रायोगिक नाटकाचे प्रयोग ऑगस्टपासून धडाक्यात सुरू होत आहेत. २० ऑगस्टला नाशिकच्या कालिदास कलामंदिरात तर २७ ऑगस्टला मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात कलगीतुराचे प्रयोग होत आहेत, अशी माहिती एनसीपीएचे चित्रपट व नाट्यविभाग प्रमुख ब्रूस गुथ्री व कार्यक्रम विभागाच्या सहव्यवस्थापक तथा कलगीतुराच्या निर्मात्या राजेश्री शिंदे यांनी दिली.
काय आहे कलगीतुरा?
कलगी म्हणजे शक्ती, तुरा म्हणजे शिव.म्हणजेच कलगीतुरा. कसंही श्रेष्ठ की तुरा श्रेष्ठ असा शाहिरी गायनातून होणारा हा अनोखा झगडा ही गावची प्रबोधनात्मक करमणूक असायची. शिवाय गावातील एखाद्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास रात्रभर त्याकुटुंबाच्या सोबतीला राहणारे, तिथे बसून कलगीतुरा गाणारे त्या दुःखाला राखायला जायचे. पण जसजसे जीवन सुखकर व समृद्ध होऊ लागले तेव्हा जुन्या प्रथा-परंपरा OUTDATED वाटू लागल्या.वेगवान जीवनशैलीत जुने मूल्यात्मक तत्व जोपासायला कोणाकडे वेळ आणि इच्छादेखील उरली नाही.परिणामी खेड्यातील कलगीतुरा अस्तंगत झाला. परंतु नेणीवेत कलात्मक मूल्य असलेल्या नव्या तरूणांनी ही दोन दशके लोप पावलेली परंपरा पुनरूज्जिवित केली. आजच्या अस्वस्थ काळात दुःख राखणीला जाणे पुन्हा सुरू झाले. या नाटकात कलगीतुराच्या या पुनरुत्थानाचा संगीतमय प्रवास मांडलाय. यातील सर्व कलावंत व तंत्रज्ञ नाशिकचे आहेत.
एनसीपीएच्या अतीशय प्रतिष्ठित “प्रतिबिंब” मराठी नाट्योत्सवाचा शुभारंभ कलगीतुरा या नाटकाने झाला होता. अनेक नाट्यरसिक आणि समीक्षकांची पहिल्याच प्रयोगात या नाटकाने मने जिंकली. कलगीतुरा नाटकाच्या निमित्ताने एनसीपीए सुमारे एक तपाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच मराठी व्यावसायिक नाटकाची निर्मिती केली.
गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक यासारख्या एकाहून एक सरस नाटके मराठी प्रायोगिक रंगभूमीला देणाऱ्या दत्ता पाटील व सचिन शिंदे यांच्या यशस्वी जोडीचे “कलगीतुरा” हे नवे नाटकही रंगभूमी गाजवते आहे, त्यांना स्वप्नील शेलार यांच्या मोहक संगीताची साथ लाभली आहे.
दिग्दर्शक सचिन शिंदे म्हणाले की, आम्ही या पारंपारिक कलाप्रकारावर सखोल संशोधन करून एक साधे, पण प्रभावी सादरीकरण करावे, हाच ‘कलगीतुरा’ करण्यामागे आमचा उद्देश होता. यातील साधेपणा अबाधित राखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कलाकार शोधून आणले. यात भरपूर संगीत असले तरी ते संगीतमय नाही. याच्या पटकथेमध्ये गाणी सुरेखपणे गुंफण्यात आली आहेत. ‘कलगीतुरा’ सादर करताना रसिकांना काल्पनिक नाट्यानुभव देण्यापेक्षा त्यांना वास्तवतेच्या जवळ घेऊन जाण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
एनसीपीएच्या वतीने ‘कलगीतुरा’ची निर्मिती करणाऱ्या राजश्री शिंदे म्हणाल्या की, जसजसे आपले जीवन विकसित होत आहे तसतसे मानवतेची मूलभूत मूल्ये अबाधित राहिली पाहिजेत.
‘कलगीतुरा’ सादर करणारे लोककलावंतही या परंपरेतून आपल्या सांस्कृतिक वारशाची परंपरा जोपासत आले आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपल्या लोकपरंपरा आणि कला लोकांपर्यंत पोहोचवणे हे एनसीपीएसाठी खूप महत्वाचे आहे. मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका कलेला पुनरुज्जीवन देऊन पुढील अनेक वर्षे ती टिकवून ठेवण्यासाठी ‘कलगीतुरा’ हे नाट्य हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. ‘कलगीतुरा’ला लाभलेला गावाकडच्या मातीतील सुरांचा अस्सल स्पर्श प्रेक्षकांच्या मनात भरून उरतो. यातील प्रतिभावान कलाकार, आशयघन कथानक आणि भावपूर्ण संगीत एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठरते. मराठीत सादर होणारं नाटक ‘कलगीतुरा’ एनसीपीएमध्ये अमराठी प्रेक्षकांना इंग्रजी सबटायटल्ससह पाहता येईल. थिएटरमध्ये जाणाऱ्या रसिकांनी हा शो आवश्य पाहण्याजोगा आहे. सर्व शोजसाठी बॉक्स ऑफिस आता खुले आहे.
kalgitura marathi drama theatre show nashik mumbai