कळवण -.कळवण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी संकलन करुन आमदार नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जोपासली असून आता त्यातून कळवण, अभोणा आणि मानूर कोविड सेंटरला कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व ऑक्सिजन मशीन,आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध होणार असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आमदार नितीन पवार यांनी कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा निधीचा धनादेश स्वीकारून आभार मानले असून शिक्षकांच्या निधीचा धनादेश गटविकासधिकारी डी एम बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील यांच्याकडे आमदार पवारांनी यावेळी सुपूर्द केला.
कळवण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन मशीनची मदत करावी असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले होते.
आमदार पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, आदिवासी शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख सभा, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती, मुख्याध्यापक शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना या संघटनेच्या पदाधिकारीशी गटविकासधिकारी डी एम बहिरम, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी चर्चा करुन कोरोना संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपसण्याचे आवाहन केले त्याला कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी प्रतिसाद देऊन अवघ्या दोन दिवसात ६ लाख ३१ हजार रुपयांचा निधी संकलन केला असून त्यातून कळवण तालुक्यातील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन मशीन,आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध होणार आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भूषण पगार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे, डॉ निलेश लाड, डॉ पंकज जाधव, डॉ पराग पगार,गटविकास अधिकारी डी.एम्.बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुधीर पाटील, शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी संजय देशमुख, संजय शिंदे, संजय पाटील, भास्कर भामरे, दीपक जगताप, शामराव भोये, दीपक वाघ, बाबुलाल सोनवणे, निलेश भामरे, सुनिल गांगुर्डे, परमेश खैरनार, संभाजी पवार, दादाजी देवरे आदि उपस्थित होते.
कोरोना विरोधात लढाईत शिक्षकांची भूमिका महत्वाची
आपत्तीकाळात सामाजिक जबाबदारी ओळखून कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठा आदर्श घालून दिला आहे. कोरोना विरोधात लढाईत प्राथमिक शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रामपातळीवर शिक्षकांचा मोठा प्रभाव असतो त्याचा उपयोग करुन ग्रामीण व आदिवासी भागात लसीकरणबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षकांनी आता पुढाकार घ्यावा.
– नितीन पवार, आमदार