मुंबई – गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील तमाशा, लावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.
लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, अधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणे, वृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावी, राज्यातील पारंपरिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे 5 एकर जागा मिळावी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणी, तमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्यासमोर मांडल्या.