इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांनंतर कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. या वेळी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेहलोत म्हणाले, की हा निर्णय रातोरात घेतला गेला, असा विचार लोक करत असतील. कोणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेतला असेल, असे वाटले असेल; पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी माझ्या आयुष्यात कधीही दबावाखाली काम केलेले नाही. ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या दबावाखाली मी हे कृत्य केल्याचे ऐकायला मिळत आहे, पण तसे नाही. वकिली सोडल्यानंतर मी ‘आप’मध्ये प्रवेश केला. अण्णा हजारे यांच्यामुळे हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी नोकरी आणि काम सोडले. आम्ही एका विचारधारेशी जोडलेले होतो. आम्हाला पक्ष आणि व्यक्तीमध्ये आशा दिसली. दिल्लीतील जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ते सतत जोडलेले होते, राजकारणात येण्याचा हा एकच उद्देश होता.
ज्या मूल्यांसाठी पक्षात प्रवेश केला होता, त्या मूल्यांशी तडजोड होताना डोळ्यासमोर दिसत आहे. ही माझी वेदना आहे आणि हीच हजारो-लाखो कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले.