नरेंद्र निकम, मनमाड
निफाड तालुक्यातील वावी ठुशी या गावातील शेतकरी पुत्र कैलास जगताप यांना पारंपारिक शेतीबरोबरच काही शेतीपूरक व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांनी गीर गाईच्या दूध उत्पादनाचा मार्ग निवडला.
गीर गाईचे दूध तसे आरोग्यदृष्ट्या फारच मौल्यवान! पारंपारिक व विदेशी गाईच्या दुधापेक्षा गीर गाईच्या दुधात आरोग्यास लाभदायक व गुणकारी असलेले घटक आहेत आणि त्यामुळे या दुधाला बाजारात दर सुद्धा अधिकच मिळतो.
कैलास जगताप यांना ही संकल्पना २०१६ मध्ये सुचली व ते अस्तित्वात आणण्याकरिता त्यांनी पायाभूत भांडवलाची गुंतवणूक करून गीर गाई घेतल्या. सुरुवातीला थोड्या प्रमाणात सुरू करून अलीकडच्या पंचक्रोशीत दूध विकण्यास सुरुवात केली. स्वतः पोलीस सेवेत असल्याने त्यांची नाशिक शहरात सुद्धा ओळख होती, आणि तीच ओळख त्यांना दुधाची विक्री करण्यास लाभदायक ठरली. गीर गाईच्या दुधाचे उत्पादक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली व अत्यंत गुणकारी असलेल्या दुधाची मागणी त्यांच्याकडे वाढत गेली. अशाप्रकारे त्यांच्या व्यवसायास उभारी मिळाली.आज त्यांच्याकडे ५० गाई आहेत. गीर गायीचे दूध आरोग्यवर्धक, कर्करोगावर गुणकारी व रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळत असल्यामुळे त्यांच्याकडे दूध मागणी फार वाढली व त्यांचा व्यवसाय प्रचलित झाला.
पुढे फक्त दूध विक्रीवरच न थांबता कैलास जगताप यांनी गाईंचे संगोपन करून व नवीन जन्मलेल्या वासरांची काळजी घेऊन दूध उत्पादनात इच्छुक असणाऱ्यांना गाईंची विक्री सुद्धा करतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मविप्र संचलित कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील, नाशिक येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषी उद्योग कार्यक्रमांतर्गत काम करत असलेली कृषीकन्या ऋतुजा कैलास मटाले हिने या यशोगाथेची माहिती घेतली व इतरांना कृषी निगडित उद्योग क्षेत्रात प्रेरणा मिळावी यासाठी तिने ही यशोगाथा सर्वांसमोर मांडली. या सर्व प्रवासात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, शिक्षणाधिकारी डॉ. एन.एस.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण; तसेच प्रा.एस.बी.सातपुते, डॉ.डी.एस.शिंदे, डॉ.भगुरे, प्रा.एस.यू.सुर्यवंशी , डॉ. के.के. सुर्यवंशी, डॉ.ए.यू.कानडे , प्रा.एस.पी.देशमुख, डॉ.व्ही.एन.गमे, प्रा.एस.बी.देसले व प्रा.एन.गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.