दिंडोरी (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – महाराष्ट्रातील प्रमुख साखर कारखान्यापैकी एक असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत पुन्हा एकदा श्रीराम शेटे यांनी निविर्वाद वर्चस्व प्रस्तापित केाले आहे. कादवा कारखान्याच्या 17 पैकी 17 जागांवर कादवा विकास पॅनलचे उमेद्वार निवडून आले असून श्रीराम शेटे यांनी सत्ता कायम राखली आहे.
कादवा कारखाना निवडणूकीत कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. यावेळी कादवा पॅनलचे नेतृत्व श्रीराम शेटे यांनी केले तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अॅड. बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांनी केले. यावेळी झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत एकुण 93 टक्के विक्रमी मतदान झाल्याने मतदानाची वाढलेली आकडेवारी कुणाला तारणार याकडे अवघे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडणूकीला सुरुवात सर्वात आधी उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था गटाचा निकाल जाहीर झाला. यात श्रीराम सहादु शेटे (26) तर संपतराव भाऊसाहेब वक्टे (9) मते मिळाली. कादवा विकास पॅनलने नेतृत्व श्रीराम शेटे यांच्या विजयाची गुढी सर्वात आधी उभारुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. तो उत्साह शेवटच्या गटाच्या मतमोजणीपर्यंत कायम राहिला. प्रत्येक गटामध्ये कादवा विकास पॅनलच्या उमेद्वारांनी आघाडी मिळवल्याने सर्वच्या सर्व उमेद्वार या निवडणूकीत निर्विवाद विजय संपादन केले.
गट निहाय उमेद्वारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :- मातेरेवाडी सर्वसाधारण उत्पादक गट : श्रीराम सहादु शेटे (6887, विजयी), दादासाहेब नथु पाटील (6206, विजयी), सुरेश रामभाऊ डोखळे (4687), निवृत्ती नामदेव मातेरे (3925) दिंडोरी सर्वसाधारण उत्पादक गट : दिनकर मुरलीधर जाधव (6676, विजयी), बाळकृष्ण पोपटराव जाधव (6404, विजयी), शहाजी माणिकराव सोमवंशी (6277, विजयी), अनिल भिकाजी जाधव (4193), प्रमोद शिवाजी देशमुख (4130), श्रीपत भिका बोरस्ते (4043), प्रवीण एकनाथ जाधव (146), दिलीप पंडीतराव जाधव (66), कसबे वणी सर्वसाधारण उत्पादक गट : विश्वनाथ सुदामराव देशमुख (6476, विजयी), बापुराव शिवराम पडोळ (6674,विजयी), नरेंद्र कोंडाजी जाधव (4513), सचिन माधवराव बर्डे (4214), वडनेर भैरव सर्वसाधारण उत्पादक गट : शिवाजीराव पंडीतराव बस्ते (6412, विजयी), अमोल उत्तमराव भालेराव (6705, विजयी), गोरखनाथ किसनराव घुले (4114), बाळकृष्ण भिकाजी पाचोरकर (4183), चांदवड सर्वसाधारण उत्पादक गट : सुकदेव दशरथ जाधव (6823, विजयी), सुभाष माधव शिंदे (6695, विजयी), निवृत्ती शंकर घुले (4274), वसंत त्र्यंबक जाधव (4165), उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था : श्रीराम सहादु शेटे (26, विजयी) संपतराव भाऊसाहेब वक्टे (9), अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी : राजेंद्र देविदास गांगुर्डे (6825, विजयी), मनोहर तुकाराम सोनवणे (4327), महिला प्रतिनिधी : चंद्रकला नामदेव घडवजे (6880, विजयी), शांताबाई रामदास पिंगळ (6763, विजयी), छाया पंढरीनाथ भुसाळ (4405), विजया सजनराव मोरे (4170), इतर मागासप्रवर्ग प्रतिनिधी : मधुकर संपतराव गटकळ (6636, विजयी), विजय राजाराम वाघ (4026), हर्षवर्धन राजेंद्र कावळे (133), भटक्या विमुक्त जाती/ जमाती/विमाप्र प्रतिनिधी : सुनील रघुनाथ केदार (6825, विजयी), रामदास शिवराम धात्रक (4266), आदी उमेद्वार विजयी झाले आहे. मतदान मोजणी आदिवासी सांस्कृतिक भवन येथे झाली. एकुण 30 टेबल होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. जी. पुरी यांनी कामकाज पाहिले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र लहारे, अरुण आव्हाड, तुळशीराम चौधरी, किशोर सानप, धनंजय माळेकर, प्रशांत पाटील, वणीचे मंगळू भरसट आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सुरेश डोखळे (परिवर्तन पॅनलचे नेतृत्व) म्हणाले की, आज धनशक्तीचा विजय झाला असून यांना बिगर ऊस उत्पादकांनी निवडून दिले आहे. आम्हाला मिळालेली सर्व मते ही ऊस उत्पादकांची असून त्यांच्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सध्या शेतीचे अतोनात हाल होत असताना संस्था जिवंत रहाणे गरजेचे होते. मात्र बिगर ऊस उत्पादकांच्या साथीने सत्ताधारी निवडून आल्याने ऊस उत्पादकांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेपेक्षा आम्हाला कारखान्याची काळजी होती. ऊस उत्पादकांनी ऊसाकडे पाठ जर फिरवली तर पुढे काय होईल हा मोठा प्रश्न आहे. चुकीच्या प्रवृत्तीतून लोकांनी मतदान केले असले तरी जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे.
कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे म्हणाले की, गेल्या 14 वर्षातील पारदर्शक कारभार, काटकसर, उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव, ऊसाच्या क्षेत्रात झालेली वाढ, यामुळे कादवा सहकारी सारखर कारखान्याने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपले नाव कमावले. इथेनॉल व विस्तारीकरण केल्याने कादवा कारखान्याची कार्यक्षमता अजून वाढली आहे. या कामकाजावर विश्वास ठेवत सभासदांनी कादवा विकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले असून त्यांनी टाकलेला विश्वास आमचे नवनिर्वाचित संचालक नक्कीच सार्थकी लावेल.भविष्यात कादवाची गाळपक्षमता वाढून 4000 हजार पर्यंत वाढविणे व सीएनजी सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही लवकरच मार्गी लावल्या जातील.