काबूल – तालिबानला मदत करण्याचे अनेक पुरावे समोर आल्यानंतर तसेच आयएसआयप्रमुख फैज हमीद यांनी काबूलचा दौरा केल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध मोठा रोष पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानावर ताबा मिळविण्यासाठी तालिबानची मदत करण्यावरून पाकिस्ताविरोधात काबूलपासून ते अमेरिकेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. काबूलमध्ये पाकिस्तानविरोधात निदर्शने करणा-या नागरिकांवर तालिबानने गोळीबार केला आहे.
काबूलमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आले होते. त्यांनी पाकिस्तान आणि आयएसआयच्या प्रमुखांविरुद्ध घोषणाबाजी करत निदर्शने केली. यादरम्यान तिथे उपस्थित तालिबानच्या लढाऊ बंडखोरांनी नागरिकांवर गोळीबार सुरू केला. सध्या कोणाचाही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानातील बल्ख प्रांतातील महिलांनी तालिबान राजवटीत प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी केली आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये महिलांच्या योगदानाला मान्यता देण्याची हीच योग्य पद्धत आहे, असे एका महिला संघटनेचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांना सक्रिय भागिदारी मिळायला हवी. महिलांविना नवे सरकार स्थापन करण्यात कोणतेच शहाणपण नाही, असे निदर्शने करणार्या महिलांनी सांगितले.
तालिबान लवकरच नव्या सरकारची स्थापना करणार असून, नव्या सरकारच्या शपथग्रहण समारंभाला पाकिस्तान, चीन, रशिया, ईराण, कतार आणि तुर्कीसारख्या देशांना निमंत्रण पाठविल्याचे बोलले जात आहे. चीन तालिबानसोबत काम करत असून, त्यांनी पाकिस्तान आणि रशियासह काबूलमध्ये दूतावास सुरू ठेवला आहे.