काबूल – काबूलमध्ये अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात अनेक लहान मुले मारले जात असल्याचे वृत आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, रविवारी झालेल्या ड्रोनच्या हल्ल्यात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र काबूर विमानतळावर हल्ल्याची तयारी करणा-या आयएसच्या आत्मघाती कार बॉम्बरवर हल्ला केला होता, असा दावा अमेरिकेने केला आहे. मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांशी बोलून सीएनएनने वृत्त प्रसारित केले आहे, त्यानुसार, अमेरिकी हल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा मुलांचा समावेश आहे. त्यापैकी २ वर्षांची सर्वात कमी वयाची मुलगी होती. हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यक्तिच्या भावाने ही माहिती दिली. या हल्ल्यानंतर सर्व शेजा-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पाच-सहा लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये वडील एक तरुण मुलगा आणि काही मुलांचा समावेश होता. त्यांच्या शरीराचे तुकडे झाले होते. अनेक लोक जखमीही झाले होते.
अमेरिकेने सलग दुस-या दिवशी रविवारीसुद्धा अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले होते. काबूल विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेल्या एका वाहनामधील आत्मघातकी हल्लेखोरांवर अमेरिकेच्या सैनिकांनी हल्ला केला होता. हे हल्लेखोर विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे स्वरक्षणासाठी हवाई हल्ला करण्यात आला होता, असे अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे.