नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये अश्लील सीडी प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झाल्याचा दावा पीडित महिलेच्या आई-वडिलांनी केला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी बेळगाव पोलिस ठाण्यात तिचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसंच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांत दिली आहे. २ मार्चला पीडितेचं अपहरण झाल्याचा दावा पालकांनी केला आहे.
एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचे वृत्त दिलं आहे. दोन मार्चला संबंधित अश्लील सीडी उघडकीस आली होती. त्याच दिवशी आपण मुलीशी शेवटचं बोललो होतो, असा दावा पीडितेच्या वडिलांनी केला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये दिसणारी महिला माझी मुलगी नाही. माझ्या मुलीसारखीच दिसणार्या महिलेचा वापर केला आहे. याचा खुलासा स्वतः पीडित मुलीनं आपल्या आईकडे केल्याचा दावाही तिच्या वडिलांनी केला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ जारी केला असून, त्यामध्ये आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अश्लील सीडी प्रकरणावरून कर्नाटकमध्ये खळबळ उडाली. या सीडी प्रकरणात कर्नाटमधील भाजप सरकारमधील जलसंधारणमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या सीडीमध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसत आहेत. मात्र हे राजकीय षडयंत्र असल्याचं रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण त्यांना भोवलं असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे प्रकरण मीडियासमोर आणलं आहे. मंत्री रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप दिनेश कलहाळ्ळी यांनी केला आहे.