विशेष प्रतिनिधी, मुंबई
टाटा समूहाचे संस्थापक अध्यक्ष जेआरडी टाटा लोकांना मदत करण्यासाठी जगभरात ओळखले जायचे. सरकारपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वर्गाला जेआरडींनी मदतीचा हात दिला आहे. पण भारताचे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनादेखील त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी जेआरडी टाटा यांनी मदत केली होती, ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे. १९९२ मध्ये केआर नारायणन भारताचे उपराष्ट्रपती झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती.
केआर नारायणन अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले. त्यांच्यात कमालीची प्रतिभा होती. १९४९ मध्ये नारायणन यांनी लंडन स्कूल आफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर भारतीय विदेश सेवेत ते रुजू झाले. त्यावेळी जेआरडी टाटा यांना शिष्यवृत्तीसाठी एका तरुणाची शिफारस करणारे पत्र मिळाले. त्याला प्रतिसाद देत जेआरडींनी आर्थिक मदत केली. त्यावेळी हाच तरुण देशाचा राष्ट्रपती होईल, याचा कुणी विचारही केला नव्हता.
लिंक्डइन या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेले हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. टाटा सन्सचे ब्रांड कस्टडियन हरीश भट यांनी जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांची एक मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट पोस्ट केली आहे. त्यात ८१ वर्ष जुने पत्रही आहे. १९४० मध्ये जेआरडी यांना शिष्यवृत्तीसाठी शिफारस मिळाली होती.
१६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती
केआर नारायणन यांनी त्रावणकोर विद्यापीठातून एमएमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जायचे होते. पत्र मिळाल्यावर जेआरडी यांनी मदत करण्याची खात्री दिली. १८९२ साली स्थापन झालेल्या जेएन टाटा एंडोमेंटच्या वतीने प्रतिभाशाली तरुणांना शिष्यवृत्ती दिली जायची. या शिष्यवृत्तीच्या आधारावर संबंधित तरुण विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकायचे. नारायणन यांचीही एक मुलाखत या ट्रस्टने घेतली आणि त्यात ते पास झाले. त्यानंतर त्यांना १६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती तर दिलीच शिवाय १ हजार रुपयांचे कर्जही दिले.