इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना, स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंग वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिक मधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधिंना बेदम मारहाण केली. पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांना मारहाण झाली. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपींविरुध्द पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक केली आहे. यात प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, ऋषीकेश योगेश गांगुर्डे यांचा समावेश आहे.
त्र्यंककेश्वरमध्ये वृत्तांकनासाठी जात असताना इलेक्टॅानिक मीडियाच्या पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्राजवळील गाड्यांची प्रवेशाची पावती घेणा-या गुंडांकडून मारहाण कऱण्यात आली. छत्री, काठी आणि दगडाने ही बेदम मारहाण करण्यात आली. या पत्रकारांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात किरण ताजणे यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती झाल्यानंतर या पत्रकारांची अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
मंत्री भुजबळ यांच्याकडून जखमी पत्रकारांची रुग्णालयात भेट
त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना, स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणी मध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजणे यांची मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या.
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून पत्रकार बांधव त्र्यंबकेश्वर येथे गेले असता स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात आले. पत्रकार बांधवांनी आपली ओळख देऊन बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. यावेळी तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यानी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर पत्रकार गाडीच्या खाली उतरल्यावर झी वृत्त वाहिनीचे पत्रकार योगेश खरे, साम वृत्त वाहिनीचे पत्रकार अभिजित सोनवणे व पुढारी वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजणे यांना जबर मारहाण केली. मुंबई वरून नाशिकच्या दिशेने येत असतांना मंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सबंधित पत्रकारांना तातडीने नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात यावे अशा सूचना केल्या.
या मारहाणी गंभीर जखमी झालेल्या पुढारी वृत्तवाहिनी पत्रकार किरण ताजणे यांना अपोलो रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी अपोलो रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करत माहिती घेतली. तसेच इतर जखमी पत्रकारांना देखील रुग्णालयात तात्काळ हलविण्यात येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच यावेळी पत्रकारांशी संवाद देखील साधला. तसेच या घटनेचा तीव्र निषेध करत तात्काळ या सर्व प्रकरणाची चौकशी करत या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच असे प्रकार पुन्हा होऊ नये तसेच येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना देखील याचा त्रास होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष दिलीप खैरे, समाधान जेजुरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.