नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर अदानी समुहाची मालकी प्रस्थापित झाल्यानंतर या वाहिनीचे कार्यकारी संपादक आणि विख्यात पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. ते आता पुढे काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर यासंदर्भात त्यांनी स्वतःच घोषणा केली आहे. यासंदर्भातील ट्वीट त्यांनी केले आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी देशात देशात राष्ट्रीय दूरदर्शन हे एकमेव टीव्ही चॅनेल होते. त्यानंतर कालांतराने खासगी वाहिन्यांचे हळूहळू प्राबल्य वाढले आता तर गल्लोगल्ली खासगी चॅनेल झाले आहेत. परंतु पहिले प्रभावी खासगी चॅनल म्हणून एनडीटीव्हीचा दबदबा होता. याला कारण म्हणजे या चॅनलमध्ये असलेले दिग्गज पत्रकार होय. परंतु आता या चॅनलचे सर्वाधिकार अदानी उद्योग समूहाकडे गेल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यम जगतात मोठी खळबळ उडाली आहे. त्यापेक्षाही आणखी मोठा धक्का म्हणजे एनडीटीव्हीतून प्रणय रॉय आणि त्यांच्या पत्नी बाहेर पडल्यानंतर आता रविशकुमार यांनीही एनडीटीव्हीच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू झाली आहे. न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता ‘एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे राजीनाम्यानंतर रवीश कुमार यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटच्या शेवटी त्यांनी नेहमीप्रमाणे ‘आपका रवीश कुमार’ असे नमूद केले आहे. या ट्वीटमध्ये NDTV चा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, त्याविषयीही त्यांनी माहिती दिली आहे. रविशकुमार म्हणतात, माननीय जनता, माझ्या असण्यामध्ये तुम्हीही सहभागी आहात. तुमचे प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे. आत्तापर्यंत तुम्हा प्रेक्षकांशी प्रदीर्घकाळ आणि एकतर्फी संवाद साधला आहे. आता माझ्या यूट्यूब चॅनलवर. हाच माझा नवा पत्ता आहे. सर्वांना गोदी मीडियाच्या गुलामीशी लढा द्यायचा आहे, असे रवीश कुमार यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटमध्ये रवीश कुमार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंकदेखील शेअर केली आहे.
अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर रवीश कुमार यांनीही राजीनामा दिल्याची माहिती एनडीटीव्हीकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या फॉलोअर्सकडून सोशल मीडियावर एनडीटीव्ही व्यवस्थापनाचा निषेध केला जात आहे. विशेष म्हणजे रवीश कुमार यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हे यशाचे शिखर गाठले. सन १९९६ पासून ते ‘एनडीव्हीशी’ जोडले गेले होते.
विशेषतः समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती यांची अचूक माहिती पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. ‘रवीश की रिपोर्ट,’ ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे देशातील सामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून रवीश कुमार मांडायचे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून रवीश कुमार यांना सर्वोच्च ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजातून मोठा पाठिंबा मिळवला. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे माध्यम जगतात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता पुढे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ravishndtv/status/1598158385127780353?s=20&t=1dWiiPOQcbcxBUcZa_IcOQ
Journalist Raveesh Kumar Big Decision After NDTV Resign